उदय दणदणे/गुहागर:गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे सुपुत्र “सहकारी मित्र मंडळ (भेलेवाडी)” प्रमुख जेष्ठ नमन लोककलावंत मधुकर रामचंद्र घाणेकर यांना नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र (अखंड-भारत) या संस्थेच्या वतीने “लोककला गौरव पुरस्कार-२०२३ ने शाल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी मुबंई साहित्य संघ मंदिर,गिरगाव मुबंई-०४ येथे नमन लोककला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख मान्यवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना -गुहागर तालुका संपर्क प्रमुख तसेच उद्योजक :प्रमोद गांधी, ॲड.सुभाष बाणे, उद्योजक:ऋषिनाथ पत्याने, कुणबी युवा अध्यक्ष:माधव कांबळे, समाजसेवक-बाळकृष्ण कुंभार, कलगी तुरा समाज उन्नती मंडळ सचीव-संतोष धारशे अशा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मधुकर घाणेकर वयाच्या १२ व्या वर्षापासून नमन लोककला अविरत जोपासत असून नमन सादरीकरणातून विविध भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत.
नमन वगनाट्यातून त्यांनी शिपाईची विनोदी भूमिका साकारून जनप्रबोधन केले आहे.अंगी असलेल्या कला कौशल्याने कोकणी ठुमरी लोककलेचे प्रेरणेते दिवंगत कविवर्य: हरी विठ्ठल अडूरवाला यांचा आदर्श घेत त्यांनी गौरी-गणपती,संगीत नृत्य,जाखडी नृत्य, खेळे नमन यामधील अनेक जन प्रबोधनपर मौकीक गीते संग्रह पाठांतर करून आज पुढच्या पिढीला जाखडी,(संगीत नृत्य) नमन लोककला जोपासण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. आपली पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय सांभाळत, नाच,नमन लोककला जोपासण्याबरोबरच गावात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरा,टिकून राहाव्यात यासाठी ते नेहमी आग्रही असतात.आज वयाच्या ६८ व्या वर्षी हा महत्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबासहित सर्वत्र होत आहे.
उपरोक्त संस्थेचा “लोककला गौरव पुरस्कार-२०२३” मला प्राप्त झाला असला तरी हा माझ्या संपूर्ण निवोशी-भेलेवाडी परिवाराचा गौरव असल्याचा पुरस्कार प्रसंगी मधुकर घाणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. निवोशी गावचा बहुमान उंचावणारा ह्या लोककला गौरव पुरस्कार-२०२३ ने माझा सन्मान केल्याबद्दल नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र-भारत मध्यवर्ती तसेच संलग्न:तालुका शाखा गुहागर कार्यकारणीचे मधुकर घाणेकर यांनी आभार मानले आहेत. तर सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मधुकर घाणेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या जात आहेत.