संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा आरंभ झाला असून, या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक स्पर्धा आणि सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रमाची रेलचेल या कालावधीत असणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वराज्य मंडळ सदस्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.
वार्षिक स्नेहसंमेलनात विविध विशेष डे’ज साजरे केले जाणार आहेत. यामध्ये मिसमॅच डे, बॉलीवूड डे, व्यक्तिमत्व प्रदर्शन, ब्लॅक अँड व्हाईट डे, सारी अँड टाय डे, ट्रॅडिशनल डे आणि ट्विन्स डे यांचा समावेश आहे. मनोरंजनात्मक फनी गेम्स आणि फिशपॉड(शेलापागोटे) यांचा अनुभवही विद्यार्थी घेणार आहेत. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून नृत्य, नाट्य, गायन व संगीताव्दारे महाविद्यालयाच्या व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
क्रीडा स्पर्धांमध्ये विविध वर्गांमधील सामने इनडोअर आणि आऊटडोअर स्पर्धेतील वैयक्तिक व सांघिक प्रकारात रंगणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांना आपले क्रीडा नैपुण्य आजमावता येणार आहेत. इनडोअर वैयक्तिक स्पर्धांमध्ये कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस यांचे एकेरी व दुहेरी प्रकार तसेच बुद्धिबळ या स्पर्धा संपन्न होणार आहेत. तर आउटडोअर क्रीडा प्रकारात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, रस्सीखेच, तर वैयक्तिक मैदानी स्पर्धेत धावणे प्रकार, उडी व फेकीचे प्रकार खेळवले जाणार आहेत.