संतोष पवार/जाकादेवी:-रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र, नावाजलेले नाट्यदिग्दर्शक व नाट्य कलाकार,समिक्षक आयु.सदानंद भागोजी पवार ( ७८ ) यांचे मंगळवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्याने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
सदानंद पवार हे अण्णा ” या टोपणनावाने सर्वत्र परिचित होते. मालगुंड येथील आम्रपाली थिएटर्स ग्रामीण व मुंबईचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जात असे. आम्रपाली थिएटर्सच्या नाट्य क्षेत्राचा ठसा गाव पातळीपासून ते अगदी मुंबईसारख्या मोठ्या शहरापर्यंत उमटविला.बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ , बौद्ध ग्रामस्थ मंडळ मौजे मालगुंड स्थानिक या मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या कला व क्रिडा समितीचे चिटणीस व बावीस खेडी बौद्धजन सेवा संघ दीक्षाभूमी वाटद-खंडाळा संघटनेचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. नाट्य क्षेत्रात काम करीत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकता कल्चर अकादमी मुंबई या प्रख्यात संस्थेने त्यांना सर्वोत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पुरस्कारान सन्मानित केले होते.सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अग्रस्थानी राहून त्यांनी उठावदार काम केले.त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.
अण्णा पवार हे अतिशय मनमिळावू, कष्टाळू आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. मालगुंड एज्युकेशन सोसायटीवर ते सल्लागार म्हणून ते काही वर्ष कार्यरत होते.टापटीप राहणी आणि मुद्देसूद मांडणी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास वैशिष्ट्ये होती.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व क्षेत्रातील जाणकार व मान्यवर तसेच बावीस खेडी संघाच्या गावशाखेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्याचे पदाधिकारी, धम्मबांधव,नाट्यप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाली होती.
दिवंगत सदानंद उर्फ अण्णा पवार यांच्या पश्चात त्यांची पत्नी, भाऊ, दोन मुलगे, मुली,पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत सदानंद पवार यांना मालगुंड एज्युकेशन सोसायटी व शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.