रत्नागिरी:-विविध मागण्यांसाठी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी पुकारलेल्या लक्षवेधी आंदोलनात उभी फुट पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्ता प्रभावाखाली असलेल्या ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू होते, त्यात मात्र अन्य राजकीय गटाच्या प्रभावाखाली असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे कामकाज ठप्प झालेले दिसले.
जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी जिल्ह्यात काम बंद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन तीन दिवस आहे. 20 डिसेंबर शेवटचा दिवस असणार आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींपैकी सुमारे 400 ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र दिसले. या संपाला अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा दिल्याची माहिती देण्यात आली.