संगलट,खेड/इक्बाल जमादार:-सध्या दळणवळणामध्येही स्पर्धा चालू असून खासगी वाहनांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेमध्ये एस.टी. महामंडळही कुठे कमी नाही. एस.टी.नेही आपल्या गाड्यांमध्ये अत्याधुनिक गाड्यांचा ताफा आणला आहे. त्यामध्ये डिजिटल बोर्ड, वाय-फाय सेवा, आरामदायी आसने दिली होती. मात्र कोट्यवधींचा खर्च करून बसविण्यात आलेली वायफाय सेवा काही काळातच बंद पडलेली दिसून येत आहे. तर डिजिटल बोर्डाचे साधे बोर्ड दिसून येत आहेत. त्यामुळे एस.टी.चा कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे.
दळणवळणाच्या साधनांपैकी विमान, रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत. खासगी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.
त्या तुलनेत एस.टी. महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांसाठी सुविधा कमी आहेत. त्यामुळे महामंडळाने तीन वर्षापूर्वी बसमध्ये वायफाय सुविधा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये मोफत मनोरंजनासाठी वायफायची सोय उपलब्ध झाली होती.
परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी.मधील वाय-फाय सुविधा बंद असल्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशीवर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. तसेच डीजिटल बोर्डही दिसेनासे झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाकडून तीन वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वाय- फायची सुविधा करून दिली होती. त्यामुळे स्मार्ट फोनधारकांसाठी बसमध्ये मनोरंजनाची सोय झाली होती. मात्र, प्रवाशांना ही साथ मर्यादित ठरली. काही महिन्यातच वाय-फायचा बोजवारा उडाला. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेली ही सुविधा बंद पडली असून वाय-फाय नॉट रिचेबल झाले आहे.
एस.टी .तील वाय-फाय सेवा बंद कोट्यवधींचा खर्च पाण्यात
