आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश
चिपळूण: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मुख्य तयारीत असलेल्या रस्त्यांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात खास बाब म्हणून बजेट अंतर्गत दोन तालुक्यातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी १२ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये चिपळूणमधील ३० रस्त्यांसाठी ८ कोटी ३५ लाख रुपये तर संगमेश्वर येथील १३ रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटी ४५ लाख अशा एकूण ४३ ग्रामीण मार्गांसाठी १२ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्हा परिषद अख्यत्यारित असलेल्या ग्रामीण भागात मार्गांची बहुतांशी कामे निधी अभावी रखडली होती. या रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली जात होती. कामे प्रलंबित राहिल्याने अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने छोटे-मोठे अपघात घडत होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी विशेष पाठपुरावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांच्याकडे या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. यानुसार ना. पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात खास बाब म्हणून बजेट अंतर्गत या रस्त्यांची सुधारणा व डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर करून दिला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.