चिपळूण प्रतिनिधी : तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय-१, चिपळूण व बार असोसिएशन चिपळूण यांचे संयुक्त विद्यमाने, दिनांक १६ रोजी जिल्हा न्यायालयात जागतिक एडस दिन व दिव्यांग आंतरराष्ट्रीय दिन साजरा करणेत आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशाने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्यस्थी जनजागृतीचे विविध कार्यक्रमांचे आयोजन निश्चित केले आहे.
आजच्या विधी साक्षरता कार्यक्रमात पी.आर. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश, चिपळूण यांनी पक्षकारांना मध्यस्थी प्रकियेने महत्त्व सोप्या भाषेत समजावून दिले. सद्यस्थितीत देशातील सर्वच न्यायालयांमधील खटल्यांचा वाढीव आकडा व दिवसेंदिवस दाखल होणारे विविध प्रकारची दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे विचारात घेता मध्यस्थी प्रक्रियेशिवाय पर्याय नाही. याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. एम.आर. काळे, सहदिवाणी न्यायाधीश, चिपळूण यांनी जागतिक एडस् दिनानिमित्त एडस् आजार कोणकोणत्या कारणामुळे होतो व प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सध्याच्या युवापिढीमध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेली टॅटू काढण्याची फॅशन यामुळे एडस् सारख्या भयानक आजाराना युवा पिढी बळी पडण्याची शक्यता वर्तविली. तसेच रक्त संक्रमण करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. स्नेहल मोहिते, पॅनल विधीज्ञ यांनी दिव्यांग व्यक्तींना असणारे अधिकाराबाबत माहिती दिली. दिव्यांग व्यक्ती ही समाजाचा एक घटक आहे व त्यांनाही सामान्य नागरिकाप्रमाणे हक्क व अधिकार प्रदान केले आहेत याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अनिता नेवसे, जिल्हा न्यायाधीश, चिपळूण व अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, चिपळूण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिव्यांग व्यक्तिसाठी घटनेने बहाल केलेले हक्क अधिकार तसेच त्यांच्याबाबत असलेल्या विविध योजना व त्यांना समाजात वावरताना असणाऱ्या सोयी सुविधांबायत मार्गदर्शन केले व या विविध दिवसांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले, तसेच मध्यस्थीसाठी प्रकरणे ठेवणेबाबत आवाहन केले. सदर कार्यक्रमाला मोठया संख्येने पक्षकार व कर्मचारी उपस्थित होते.
तालुका विधी सेवा समिती चिपळूणतर्फे जनजागृती कार्यकम साजरा
