नराधमाला चार दिवसांची पोलीस कोठडी
चिपळूण:- दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना सावर्डे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. पोलिसांनी तत्काळ या नराधमाचा शोध घेऊन त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडित मुलीच्या मोबाईलवर हा नराधम संपर्क करत होता. हा फोन ती टाळत असताना देखील तो सतत फोन करत असे. त्यानंतर तो नराधम मुंबईतून सावर्डे परिसरात दाखल झाला. तिच्याशी बोलायचे असल्याचे सांगून पिडित मुलीला त्याने तिच्या घराबाहेर बोलावले व जबदरस्तीने गाडीवर बसवून तिला त्याच्या मित्राच्या घरी आणले. तिथेच त्याने त्या पिडित मुलीवर अतिप्रसंग केला. हा प्रकार सावर्डे पोलीस स्थानकात गेल्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी त्या नराधमाचा शोधासाठी तपास यंत्रणा गतीमान केली. अखेर तो नराधम पोलिसांच्या सापळ्यात सापडला. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यावर सावर्डे पोलीस स्थानकात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.