राजापूर:-थंडीचा मोसम सुरू झाल्याने दरवर्षी या मोसमात दाखल होणारे परदेश सीगल पक्षी तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पाहुण्यांचा या किनारपट्टीवर मुक्काम राहीला आहे.
देशाच्या सीमेवरील लडाखच्या प्रदेशामध्ये आढळणारा सीगल पक्षी दरवर्षी थंडीच्या मोसमात पश्चिम किनारपटटीवर येत असतात. लाल भडक चोच, पांढरे शुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या सीगल पक्ष्याच्या थव्याने तालुक्याची पश्चिम किनारपट्टी सध्या फुलून गेली आहे. या पक्ष्यांच्या किलबिलाट आणि गोंगाटाने परिसर गजबजून गेला आहे.
नाविण्यपूर्ण असलेल्या सीगल पक्ष्याला पाहण्यासाठी निसर्गप्रेमींसह पर्यटकांची पावलेही आपसूकच समुद्रकिनारपट्टीकडे वळू लागली आहेत. सीगल पक्ष्याच्या वास्तव्याने समुद्रकिनारपट्टीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली आहे.
गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या पश्चिम सागरी किनारपट्टी भागामध्ये सीगल पक्ष्यांचे आगमन होत आहे. त्याप्रमाणे यावर्षीही तालुक्याच्या सागरी किनारपट्टी भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सीगल पक्ष्यांचे वास्तव्य दिसत आहे. देशाच्या सीमेवरील लडाख प्रदेशामध्ये मुख्यत्वेकरून आढळणारा सीगल पक्षी गेल्या काही वर्षामध्ये थंडीच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर वास्तव्याला येतो. थंडीच्या कालावधीमध्ये लडाख प्रदेशामध्ये मोठ्याप्रमाणात पडणाऱ्या बर्फामुळे या कालावधीमध्ये या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. अशा वेळी ज्या परिसरात खाद्य मिळणे शक्य आहे किंवा वास्तव्याला अनुकूल असलेल्या परिसरामध्ये हा पक्षी काही कालावधीपुरता अन्य पक्ष्यांप्रमाणे स्थलांतरीत होत असतो. त्याप्रमाणे सीगल पक्षी यावर्षीही तालुक्यात स्थलांतरीत झाला आहे.
वेत्ये, आंबोळगड, नाटे आदी परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य राहिले आहे. आकाशामध्ये विलोभनीयरीत्या घेतलेली झेप आणि एका झेपेमध्ये भक्ष्याला केलेले लक्ष्य आदी सीगल पक्ष्याच्या विलोभनीय क्लुप्त्या आणि त्यातून होणाऱ्या या पक्ष्याच्या हवेतील सहजसुंदर कसरती पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्याकडे सध्या वळू लागली आहेत.