रायगड:-जिल्ह्यात चार महिन्यांत तब्बल ३४३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ऑगस्टमध्ये समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडली होती. शुक्रवारी (ता.८) खालापूर येथील एका बंद कारखान्यावर रायगड पोलिसांनी छापा टाकत १०७ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ताब्यात घेतले.
त्यानंतर सोमवारी (ता.११) होनाड गावातील गोदामातून परदेशात निर्यात करण्यासाठी तयार असलेला २१८ कोटी १२ लाखांचे अमली पदार्थ पोलिसांच्या हस्तगत केले. रायगड जिल्हात अमली पदार्थ सापडण्याचे प्रकार वाढले असून अद्यापही काही कोटींचे अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आल्याची शक्यता आहे.
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांसाठी हे अमली पदार्थ वापरले जाऊ नये, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे.
जिल्ह्यातून आतापर्यंत कोट्यवधींच्या रुपयांच्या अमली पदार्थांची आयात-निर्यात होत असल्याचे समोर आले आहे. छापा पडेपर्यंत ढेकू येथील कारखान्यात तयार केलेले मेफेड्रॉनची जेएनपीटी बंदरातून निर्यात सुरू होती.
तर चरसची अफगाणिस्तानातून आयात होत होती. आतापर्यंत अपघातानेच सापडलेल्या अमली पदार्थाच्या आंतररराष्ट्रीय रॅकेट कोणत्याही यंत्रणेचे लक्ष गेले नव्हते. यात राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असण्याचा संशयही व्यक्त होत आहे. मंगळवारी अमली पदार्थांचा विषय हिवाळी अधिवेशनात चर्चेला आल्यानंतर तपास यंत्रणेची चक्रे वेगाने फिरू लागले आहेत.
चार दिवसांत पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले असून रेवदंड्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे. चरस तस्करीचा तपास करताना दोन महिन्यांपूर्वी पोलिस आणि तटरक्षक दलाने किनाऱ्यावरील लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न होता.
त्यानंतर वाहून आलेल्या चरसच्या पाकिटांची वाहतूक करताना रोह्यातून काही स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले होते. मुरूड शहरापासून जवळच कांदळवनात रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी स्थानिक तरुणांना अटक केली. यावरून जिल्ह्यातील तरुणपिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे.
रायगडमध्ये सापडलेले अमली पदार्थ
तारीख -समुद्र – वजन (किलो) -किंमत
२७ ऑगस्ट -जीवना बीच – १० – ४१ लाख
२८ ऑगस्ट – मारळ बीच – ३५ -१ कोटी ४२ लाख
२८ ऑगस्ट -सर्वेसागर बीच – २६ – १ कोटी ७ लाख
२९ ऑगस्ट- कोंडिवली बीच -३३ -१ कोटी ३३ लाख
२९ ऑगस्ट – दिवेआगर बीच- ५५ – २ कोटी २२ लाख
३० ऑगस्ट -कोर्लई बीच – २४ -९९ लाख ६३ हजार
३१ ऑगस्ट -आक्षी बीच – ६ -२६ लाख
३१ ऑगस्ट -नानिवली बीच -१ -४ लाख
३१ ऑगस्ट – श्रीवर्धन बीच – १४ – ५९ लाख
०८ ऑगस्ट- खालापूर – ८५ – १०६ कोटी ५० लाख
१० ऑगस्ट – खालापूर – होनाड- १७४.५ – २१८ कोटी १२ लाख
तीन वर्षांपासून मेफेड्रॉनचे उत्पादन
खालापूर तालुक्यात ढेकू गावातील बंद पडलेल्या इंडिया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कारखान्याची जागा भाड्याने घेत अचल केमिकल्स नावाने अनधिकृत रासायनिक कारखाना सुरू होता. कारखान्यात तयार केलेला माल होनाड गावातील गोदामात ठेवला जात होता.
तेथे त्याचे पॅकिंग करून जेएनपीए बंदरातून परदेशात पाठवले जात होते. तीन वर्षांत यातून काही टनामध्ये मेफेड्रॉन (एमडी) तयार करण्यात आले असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता, तयार उत्पादनापैकी काही भाग स्थानिक बाजारात विकला जात असल्याचे समोर आले.
एमडी नेमके काय आहे?
एमडी हा एक रासायनिक अमली पदार्थ आहे. बहुतेक वेळा पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाच्या भुकटीच्या स्वरूपात तर काही वेळा कॅप्सूलच्या स्वरूपात तो वितरित होतो. त्यामुळे तोंडावाटे अथवा नाकातून ओढता येतो. व्यसनी पानमसाला व इतर पदार्थांसह त्याचे सेवन करतात. एमडी हा पदार्थ साधारण २००० वर्षानंतर वितरित होऊ लागला.
सुरुवातीला त्याला अमली पदार्थ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. प्रतिबंधित नसल्यामुळे राजरोसपणे त्याची निर्मिती व विक्री केली जायची. त्याचा प्रभाव कोकेनसारखा असतो. मात्र किंमत १० पटींनी कमी असते. त्यामुळे त्याच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.
रत्नागिरीमध्ये सापडली २४९ पाकिटे
१४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरसची पाकिटे अनेक समुद्र किनारी वाहून आली. कर्डे, लाडघर, केळशी, कोलथारे, मुरूड, बुरोंडी, दाभोळ आणि बोऱ्या किनाऱ्यांवर चरसची पाकिटे सापडली. दापोली कस्टम विभागाचे कर्मचारी स्वातंत्र्यदिनाच्या पू्र्वसंध्येला किनाऱ्यावर गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना कर्डे किनाऱ्यावर १० संशयित पाकिटे सापडली. त्यांचे वजन १२ किलो होते. यानंतर केळशी आणि बोऱ्या किनाऱ्यांवर शोध मोहीम राबवण्यात आली.
चरस तस्करीचे श्रीवर्धन केंद्रबिंदू
एका मागून एक प्रकरणे बाहेर येत असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात किती घट्ट बस्तान मांडलेले आहे, हे दिसून येत आहे. चरस तस्करीच्या प्रकरणावरून सागरी किनारपट्टी किती असुरक्षित आहे, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर २७ ऑगस्टपासून तीन दिवसांत ९ ठिकाणी साधारण दोन क्विंटल चरसची पाकिटे सापडली. यातील ७ ठिकाणे श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. यामुळे चरस तस्करीचे केंद्रबिंदू श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या आसपासचे असावे, असा रायगड पोलिसांचा संशय आहे.
तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी
मुरूड येथे वाहून आलेल्या चरसचे सेवन करताना दोन महिन्यापूर्वी एका तरुण-तरुणीला पोलिसांनी अटक केली. समुद्रकिनारी जे चरसचे पाकिट मिळाले त्याचे सेवन केल्याची कबुली दिली. दारू, सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखू याचे दुष्परिणाम जगजाहीर आहेत. ड्रग्स व इतर व्यसनांचे परिणाम आणखी गंभीर आहेत. अमली पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची अन्न ग्रहण करण्याची इच्छाच नाहिशी होते. मानसिक आजार जडतात, नजर कमजोर होते, स्मृतिभ्रंश, मधुमेह जडतो, मेंदूच्या कार्यावर व लैगिंक जीवनावरही परिणाम होतो.
खालापुरमधील औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखाने बंद आहेत. यापैकी एक असलेल्या अचल केमिकल्समध्ये मेफेड्रॉन बनवण्याचा कारखाना सुरू होता.
ग्रामपंचायत, एमआयडीसी, वीज वितरण, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्वच अधिकाऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे.