चिपळूण:-शहर पोलीस स्थानकासमोरील एक जुनाट वृक्ष कोसळून विद्युत वाहिन्या तुटून पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. यात एक सायकलस्वार सुदैवाने बचावला आहे. मुख्य रस्त्यावर हा पकार घडल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही तासाच्या अवधीनंतर हा वृक्ष रस्त्यावरुन बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात झाली.
चिपळूण शहरातील बुरूमतळी मार्गावर पोलीस स्थानकाच्यासमोर असलेला जुनाट वृक्ष अचानक तुटून पडला. यावेळी मोठा आवाजही झाल्याने या आवजानेच पोलीस कर्मचारी धावत बाहेर पडले. हा वृक्ष कोसळतेवेळी विद्युत वाहिन्याही तुटून पडल्या. यावेळी पोलीस स्थानकाबाहेर काही चारचाकी वाहनेही उभी होती. शिवाय हा वृक्ष कोसळतेवेळी एक सायकलस्वार सुदैवाने बचावला. रस्त्याच्या मधोमध हे झाड पडल्याने पॉवर हाऊस ते बुरुमतळी अशी ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली. अखेर पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक अन्य रस्त्यावरुन वळवण्यात आली. या घटनेची माहिती पोलिसांनी तत्काळ महावितरण कार्यालयाला दिल्यानंतर बुरुमतळी मार्गावरच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. तसेच नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा वृक्ष रस्त्यापासून बाजून करण्यात आला. यानंतर विद्यतवाहिन्या पूर्ववत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र वाहतूक फांद्या हटवल्यानंतर पूर्ववत करण्यात आली.