गुहागर:-गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मोहल्ला येथील घराच्या परिसरामध्ये सापडलेल्या खवले मांजराला वनविभागाच्यावतीने सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आले.
तालुक्यातील शृंगारतळी मोहल्ला येथे शनिवारी रात्री उशीरा येथील घराच्या परिसरामध्ये खवले मांजर आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. यावर वनपाल व वनरक्षक यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. या खवले मांजराला सुरक्षितपणे ताब्यात घेवून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. वैद्यकीय तपासणीमध्ये हे खवले मांजर सुस्थितीत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्यावर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. या कामी गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, वनरक्षक अरविंद मांडवकर यांनी काम पाहिले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास या बाबत तत्काळ माहिती देण्यासाठी वनविभागाचा टोल फ्री क्र. 1926 या कमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.