रत्नागिरी:-भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, डायग्नोस्टिक व रिसर्च सेंटर चिपळूण यांचेमध्ये आज दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी तटरक्षक दलाच्या जवानांना माफक सवलत दरात दर्जेदार आरोग्य सुविधा प्रदान करण्याबाबत चिपळूण येथे सामंजस्य करार करण्यात आला.
भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी जे कोकणातील तटरक्षक दलाचे एक प्रमुख कार्यालय असून त्याचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील समुद्र किनार्यापर्यंत पसरलेले आहे. बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, डायग्नोस्टिक व रिसर्च सेंटर चिपळूण हे संपूर्ण कोकणात नावाजलेले, अद्ययावत व सुसज्य असे चिकित्सा केंद्र आहे. या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या सर्व कार्यरत सैनिक, असैनिक कर्मचारी, सेवानिवृत्त सैनिक व कर्मचारी आणि त्यांचे आश्रित कुटुंबीय यांना सर्व वैद्यकीय उपचाराचा बरोबरच आपत्कालीन आणि तज्ञ चिकित्सा देखील केंद्र सरकार स्वास्थ्य योजनेच्या अत्यल्प दराने प्राप्त होणार आहे.
तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रूजीत सिंह तर वालावलकर हॉस्पिटल तर्फे व्यवास्थापकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील यांनी या करारावर स्वाक्षर्या केल्या. यावेळी तटरक्षक दलाचे स्टेशन वैद्यकिय अधिकारी सर्जन लेफ्टनंट कमांडर गोपन जीजे आणि वालावलकर हॉस्पिटलचे जन संपर्क अधिकारी डॉ असावरी मोडक हे देखील उपस्थित होते. वालावलकर हॉस्पिटल हे सैन्य दलाबरोबर सामंजस्य करार करणारे देशाच्या संपूर्ण पश्चिम क्षेत्रातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे.
रत्नागिरी हे तटरक्षक दलाचे एक मोठे तळ तयार होत असून येथे आजतागायत सुमारे 700 सैनिक व कर्मचार्यांची मान्यता केंद्र सरकारने दिली आहे. जसजशी तटरक्षक दलाची विविध कार्यालाये आणि आस्थापणे रत्नागिरी येथे तयार होतील तसे हे मनुष्यबळ आणखी वाढणे आपेक्षित आहे. या मनुष्यबळास आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास तटरक्षक दल प्राधान्य देत आहे. या कराराच्या अनुषंगाने उपमहानिरीक्षक शत्रूजीत सिंह यांनी जिल्ह्यातील तटरक्षक दलाच्या सर्व आजी माजी सैनिक आणि असैनिक कर्मचार्यांना या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि वालावलकर हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार
