चिपळूण:-बंद फ्लॅट फोडून तब्बल 3 लाख 3 हजार किमतीचे दागिन्यांसह रोख रक्कम लांबवल्याची घटना 9 रोजी खेर्डी बाजारपेठ येथील अनंत साई अपार्टमेंटमध्ये घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतीमान करत सराईत चोरट्याला त्याच्या राहत्या घरातून अवघ्या दोन तासात अटक केली. त्याने चोरलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला असून या चोरट्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पवन जयंत आंबेडे (28, वालोटी-आंबेडेवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंत साई अपार्टमेंटमधील एक सदनिका बंद असताना पवन आंबेडे याने या सदनिकेच्या शौचालयाच्या खिडकीच्या काचा काढून त्यातून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने कपाटाचे लॉकर उचकटून आतील स्टीलच्य छोट्या पेटीतील 2 लाख 87 किंमतीचे सोन्याचे दागिने, तसेच रोख रक्कम 16 हजार रुपये, असा 3 लाख 3 हजाराचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार सदनिका मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या चोरीच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक रवींद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने तपास यंत्रणा गतीमान केली. गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी पवन आंबेडे याने केल्याचे स्पष्ट होताच त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी तो तालुक्यातील वालोटी येथे रहात असल्याच्या माहितीनुसार अवघ्या दोन तासात त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने चोरलेल्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
चिपळुणात फ्लॅट फोडणाऱ्या चोरट्याला दोन तासात अटक
