रत्नागिरी/प्रतिनिधी:-धनादेश न वठल्या प्रकरणी शिक्षा ठोठावलेल्या आरोपीची तुरुंगवासाशिवाय मुक्तता करण्यात आल़ी. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी याने सत्र न्यायालयापुढे अपील केले होत़े तसेच तक्रारदार यांचे पैसे चुकते केल्याने प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात यावे अशी विनंती केली होत़ी. त्यानुसार न्यायालयाने तडजोडीअंती आरोपीची तुरूगंवासाची शिक्षा रद्द केल़ी.
खटल्यातील माहितीनुसार योगेंद्र श्रीपाद ढोले यांनी धनादेश अनाधारित झाल्या प्रकरणी आरोपी अनिल गोविंद ढोले यांचे विरुद्ध 2016 साली खटला दाखल केला होता. या खटल्यामध्ये सुनावणी होऊन, रत्नागिरी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. पवार यांनी आरोपी अनिल गोविंद ढोले याला तीन महिने साधा कारावास आणि 2 लाख 74 हजार 750 रुपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश केले होते. तसेच नुकसान भरपाई रक्कम न दिल्यास आणखी एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती.
आरोपी अनिल गोविंद ढोले यांनी सत्र न्यायालयात अपील करून शिक्षेला स्थगिती मिळवली होती. या अपील कामी आरोपी अनिल ढोले यांनी 2 लाख 84 हजार रूपये एवढी रक्कम फिर्यादी योगेंद्र ढोले यांना देण्याचे मान्य केले व त्याप्रमाणे रक्कम अदा केली. त्यामुळे सदर अपिलाचे कामी लोक अदालतमध्ये फिर्यादी योगेंद्र ढोले यांनी तडजोड करून आरोपी नात्यातील असल्याने, आरोपीला शिक्षेची मागणी मागे घेतली. त्यामुळे या प्रकरणात आरोपीची शिक्षेशिवाय मुक्तता करण्यात आली आहे. रत्नागिरीचे मे. जिल्हा न्यायाधीश एक अनील आंबळकर यांचे अध्यक्षतेखालील पॅनल समोर सदर यशस्वी तडजोड घडवून आणली गेली.
धनादेश न वठल्याप्रकरणी झालेली शिक्षा तुरुंगात न जाताच झाली मुक्तता
