दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी:-मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रखडलेल्या महामार्गामुळे अनेकांचे जीव जात आहेत. रखडलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर होत असलेले अपघात हा मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. असाच एक भीषण अपघात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास महामार्गावरील चरवेली नजिक झाला. या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे राहुल आव्हाड (राहणार पनवेल, जिल्हा रायगड) असे नाव आहे.
राहुल हा आपल्या दुचाकीवरुन मुंबईच्या दिशेने जात असताना चरवेली नजिक आला असता अपघात झाला. ट्रकच्या उजव्या बाजुच्या खाली दुचाकी घुसलेल्या स्थितीत पाहायला मिळाली. सोमवारी (दिनांक ११ डिसेंबर २०२३) रात्री साडेआठच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना महामार्गावर घडली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज नानिज धाम रुग्णवाहिका घेऊन चालक बाळू केतकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत ट्रॅफिक पोलीस देखील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांच्या मदतीने दुचाकी स्वाराला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून या अपघाताची नोंद करण्याची पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रायगड पनवेल येथे राहुल यांचे लग्न डिसेंबर 2017 मध्ये झाले होते.आयटी क्षेत्रात ते काम करत होते. पनवेल परिसरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. या अपघाताचे वृत्त कळताच पनवेल परिसरातील त्यांच्या मित्र परिवारामध्येही शोकाकुल वातावरण आहे. राहुल हा पनवेल येथेच वास्तव्यास होता. आयटी क्षेत्रातील कंपनीत तो कार्यरत होता. त्याच्या अपघाती निधनाने आव्हाड कुटुंबीयांवरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक आमदारांनी लक्ष देण्याची गरज
पाली ते हातखंबा या भागात तुकड्यात लेन सुरू करण्यात आली आहे. मात्र काही महत्वाच्या ठिकाणी धोकादायक रस्ता तशाच स्थितीत पाहायला मिळतो. तसेच एकाच लेनवरून गाड्या मार्गक्रमण करत असल्याने मध्यभागी कोणतेही पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास रस्ता कुठे जातोय याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. एकूणच रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांसह चालकांना जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागत आहे. या धोकादायक रस्त्यांवर जिथे दिशा फलक लावणे महत्वाचे आहे अशाच ठिकाणी दिशा फलक नसल्याने रात्रीचा प्रवास करताना दुचाकीस्वारांना अपघाताला आयतेच आमंत्रण देत आहे. या रस्त्याबाबत आता स्थानिक आमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मृतांच्या कुटंबीयांना सरकारने मदत करावी
प्रवाशांचे, वाहनचालकांचे बळी घेऊनच चौपदरीकरणाचे काम वेगाने होणार असेल तर खड्ड्यात महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः चे प्राण द्यावे. या महामार्गाला आता प्रशासनाने “मृत्यूचा महामार्ग” असेच नाव देयला हवे. या रस्त्यावरून वाहनचालकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय. मिऱ्या नागपूर महामार्गावरील हातखंबा ते रत्नागिरी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड धूळ आणि चाळण झालेले रस्ते लोकांचे नाहक बळी घेतायत. महामार्गावर बळी जाणाऱ्या मृतांच्या कुटंबीयांना शासनाने पाच कोटीची मदत करावी. तरच हे सरकार सामान्य माणसांचे म्हणता येईल.
– प्रवासी मुकुंद सावंत,पाली