चिल्लरची किटकिट बंद करण्यासाठी नामी शक्कल
रत्नागिरी:-एसटी प्रवासादरम्यान वाहकासोबत सुट्टया पैशांवरून होणारे वाद टाळता यावेत यासाठी एसटी महामंडळाकडून नामी शक्कल शोधून काढण्यात आली आह़े. एसटी महामंडळाने आता प्रवासी भाडे तिकीट हे 5 व 10 रूपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
खासगी प्रवासी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आजही एसटीला पवाशांची पसंती मिळत आह़े. विशेषकरून ग्रामीण भागातील प्रवासी आजही एसटीवर अवलंबून आहेत़ मात्र तिकीटदर प्रतिकीलोमीटर नुसार असल्याने प्रवासी व वाहक यांच्यात वाद निर्माण होत असतात़. काही वेळा हे वाद अगदी हाणामारी पर्यंत देखील जातात़. यावर उपाय काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून तिकीटदर 5 व 10 रूपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े. त्याचप्रमाणे एसटी मंडळाकडून देखील हायटेक होत ऑनलाईन तिकीट बुकींग, गुगलपे, फोन पे, पेटीएम, भीमऍप अशा माध्यमातून देखील तिकीटांचे पैसे स्विकारण्यास सुरूवात केली आह़े. मात्र ग्रामीण भागात मोबाईल फोन यांना नेटवर्क मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले आह़े. त्यामुळे ऑनलाईन पैसे देण्यात अडचणी येत आहेत़ अशा वेळी एसटी महामंडळाकडून 5-10 रूपयांच्या पटीत तिकीट आकारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने सुट्टया पैशांचा वाद काही अंशी कमी होण्यास मदत होणार आह़े.