संगलट,खेड/इक्बाल जमादार:-पुणे परिसरातील एकूण चार
मित्र पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. दरम्यान १० डिसेंबर रोजी रविवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास दापोली तालुक्यातील कर्दै सागर किनारी दुर्दैवी घडली. या दुर्दैवी घटनेत पर्यटनासाठी आलेल्या एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दशरथ यादव असे आहे. ते पुणे येथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेले पर्यटक दशरथ यादव हे अविवाहित तरुण होते. त्यांच्या या अशा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना कळविण्यात आली आहे. त्यांचे नातेवाईक पुणे येथून दापोली येथे दाखल झाल्यावर शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या दुर्दैवी घटनेची खबर किरण कैलास निवंगुने राहणार पुणे यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. या सगळ्या दुर्दैवी घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली आहे अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.
पुण्यातील पर्यटकाचा दापोली येथे बुडून मृत्यू
