रत्नागिरी – समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी शिस्त राखली पाहिजे. जीवनामध्ये आपला विकास करण्यासाठी आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर योग्य आणि आवश्यक करावा, असे मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शुभांगी साठे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
युवक-युवतींना मानवी हक्क दिन या दिवसाचे महत्त्व सांगताना, श्री सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये आपला विकास करण्यासाठी आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
श्री. यादव गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मानवी हक्क दिनाची पार्श्वभूमी सांगून भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांकरिता असलेल्या समाज कल्याण विभागाच्या यॊजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पंकज घाटे यांनी मानवी हक्काचा जाहीरनामा याबाबतीत कायद्यातील तरतुदी तसेच न्यायालयातील कलमे तरतुदी यांची माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उकिरडे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रितेश सोनावणे यांनी केले.