सावंतवाडी:-तब्बल १० जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या सांगली येथील रॅकेटचा पर्दाफाश करण्यास सावंतवाडी वनविभागाला यश आले आहे. ही कारवाई आज सावंतवाडी व सांगली वनविभागाच्या पथकाने संयुक्त रित्या केली.
यात तब्बल ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितातील रोहित कोळी याने रानडुक्कर आणि साळींदर या वन्य पाण्याची शिकार करून तो व्हिडिओ रोहित कोळी शिकारवाला या इंस्टाग्राम पेजवर व्हायरल केली होता. त्याचा शोध घेत असताना हे रॅकेट उघड झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित कोळी शिकारवाला या इन्स्टाग्राम अकाउंटवर रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा संबंधित रोहित कोळी याला अटक करण्यासाठी त्याच्या मागे सावंतवाडी वन विभागाची टीम याबाबत कसून तपास करत होती. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची टीम रवाना झाली. यानुसार फिरते पथक सांगली यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली हायवेवर रोहित कोळी व इतर ५ आरोपी यांना १० जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. संबंधीताच्या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांचे वन विभागाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही समाज माध्यमावर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविषयी वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी. शिकारीसारख्या अवैद्य कृत्याचे कोणत्याही स्वरूपात समर्थन करू नये, वन विभागाचे सायबर सेल देखील अशा आक्षेपार्ह पोस्ट बाबत दखल घेत असून याबाबत समाजमाध्यम वापरकर्त्यांनी सजग रहावे.
संबंधित कारवाई ही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर आर. एम. रामनुजम, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक श्री. अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.