पुणे:-रेल्वेचा प्रवास करताना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यात अलार्म चेन असते. आपत्कालीन काळातच ही चेन ओढण्याची परवानगी आहे.
परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी विनाकारण चेनचा वापर करून व्यत्यय आणल्याचे प्रकार आढळले आहेत.
यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दहा महिन्यांत मध्य रेल्वे विभागात ७९३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वेतून प्रवास करताना जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास किंवा अपघात, आग लागणे अशावेळी प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी अलार्म चेन ओढून रेल्वे थांबविण्यासाठी ओढली जाते. परंतु काही प्रवासी विनाकारण किरकोळ कारणासाठी मुद्दामहून चेन ओढतात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. परिणामी गाडी थांबल्यामुळे मागच्या गाड्यांना उशीर होतो. त्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी विलंब होतो. काही प्रवाशांना स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे गाडी थांबविण्यासाठी अलार्म चेन ओढले जातात. यामध्ये दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात याचे प्रमाण जास्त झाले होते. यामुळे एका महिन्यात १९७ गाड्या उशिराने धावल्या. यात मुंबई विभागात ७३ मेल/एक्स्प्रेस, भुसावळ-५३, नागपूर-३४, पुणे-३० आणि सोलापूर विभागात ८ गाड्यांना फटका बसला. अशा प्रवाशांवर रेल्वेच्या कायद्यानुसार कलम १४१ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.
विनाकारण रेल्वेची चेन ओढणे पडले तब्बल पावणेतीन लाखांना, ७९३ जणांवर गुन्हे दाखल
