गुहागर:- तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने रेड रिबन क्लब च्या सहकार्याने ०१ डिसेंबर पासून ‘एड्स जागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर रोजी एड्स प्रतिबंध बाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एड्स विषयावर पोस्टर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे आज महाविद्यालयापासून शृंगारतळी बाजारपेठेपर्यंत जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला कला विभाग प्रमुख डॉ. प्रमोद देसाई यांनी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माननीय महेशजी कोळवणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अशा प्रकारच्या उपक्रमांना संस्थेचा नेहमीच पाठिंबा आहे, विद्यार्थ्यांनी देशाचे भावी जबाबदार नागरिक म्हणून सर्व उपक्रमात उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे असे आवाहन श्री. कोळवणकर यांनी केले आणि रॅलीला झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. या रॅली मध्ये सुमारे २०० पेक्षा जास्त विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. एड्स पासून बचाव करण्या बाबतचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पालपेणे रस्त्याजवळ विद्यार्थ्यांनी मॉब फॅशचे प्रात्यक्षिक सादर केले.
प्राचार्य डॉ. शिंधे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्ष प्रमुख
प्रा. लंकेश गजभिये, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुभाष खोत, डॉ.दिनेश पारखे, डॉ. प्रमोद देसाई, प्रा. सौम्या चौघुले, डॉ. जालिंदर जाधव आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि रॅली यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.प्रवीण सनये आणि डॉ. प्रसाद भागवत यांनी रॅलीचे आयोजन केले होते. याच उपक्रमांतर्गत महाविद्यालयात दोन दिवस पोस्टर प्रदर्शन करण्यात आले आहे.