खेड/प्रतिनिधी:-ग्रुप ग्रामपंचायत उंबरशेत, ता. दापोली, यांच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता बॉक्साईट मायनिंग उत्खननाचे काम चालू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतकडून निवेदन सादर केले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे के ग्रुप ग्रामपंचायत उंबरशेत कार्यक्षेत्रात आशापुरा माईन केम लि. दापोली यांच्यामार्फत सन-२००७ पासून बॉक्साईट मायनिंग उत्खननाचे काम सुरू झालेले होते. त्यावेळी संबंधित कंपनीकडून ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला/NOC वेळोवेळी घेतल्या जात होत्या. मध्यंतरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर काम बंद होते. तरी सदरचे काम आशापुरा माईन केम लि. दापोली व वेस्टर्न इंडिया मायनर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त उपक्रमातून दि. १८/१०/२०२३ पासून मायनिंग उत्खनन सुरू झाल्याचे समजते. परंतु यावेळी संबंधित कंपनीने ग्रामपंचायलतीला कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न देता व ना हरकत दाखला/NOC न घेता परस्पर मनमानी करून मायनिंग उत्खनन व वाहतूक करणे हे काम सुरू केले असून हा ग्रुप ग्रामपंचायत उंबरशेत या स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक प्रकारे अपमान आहे.
ग्रामपंचायतीला, जमीनदार व लगतदारांना विश्वासात न घेता व ग्रामपंचायतीला उत्खनन -केल्याबद्दल कर स्वरुपात किंवा विकासकामांच्या स्वरुपात सहकार्य न करता वरील संबंधित कंपन्यांनी बॉक्साईट मायनिंग उत्खननाचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त आहे. त्याचप्रमाणे उंबरशेत गावठाणवाडी, बौद्धवाडी, नबी मोहल्ला, संभाजीनगर,
नवानगर या पाच वाड्यांना बंधाऱ्यातून ग्राव्हिटी द्वारे ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये संबंधित कंपनीमधून येणारा गाळ, माती, रेवसा बंधाऱ्याच्या चेंबर मध्ये
अडकल्याने सदरचा गाळ साफ करण्यासाठी प्रतिवर्षी ५०,०००/-रु. ग्रामपंचायतीला खर्च येतो.
तसेच वरील संबंधित कंपन्यांचे शासनाने ठरवून दिलेल्या लोडपेक्षा जास्त लोडचे डंपर्स रस्त्याने वाहतूक करत असतात. त्यामुळे शाळेत जाणारी मुले, वयोवृद्ध ग्रामस्थ, गरोदर
महिला यांना सदर वाहतुकीचा त्रास होत असून या ओव्हरलोड डंपर्सचा अपघात घडू शकतो. तसेच या मायनिंगमुळे निसर्गाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन जैवविविधता विस्कळीत झाली आहे. सगळीकडे धुळीचे वातावरण पसरून हवामान बिघडले आहे, त्याचा फटका येथील स्थानिक शेतकऱ्यांना बसून शेती नापीक झाल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. त्यामुळे मायनिंगला तीव्र विरोध राहील असे ग्रामस्थचे म्हणणे आहे.
मायनिंग उत्खनन व वाहतुकीचे काम तात्काळ बंद करण्याच्या सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
मादीवली पूल हा गेल्या 52 वर्षापासून जुना आहे या पुलावरून वाहतुकाची क्षमता सुमारे नऊ टन असून आता ह्या पुलावरून 25 ते 30 टन वाहनाची बॉक्साईटने भरलेली वाहतूक होत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जहूर भाई झुमटकर यांनी आवाज उठवला होता. त्यांनी शासनाला जबाबदार धरले जाईल असेही म्हटले आहे.