राजापूर:- तालुक्यातील ओणी येथे कोकण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवींचे काव्य सादरीकरण, कविसंमेलन, कथाकथन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साहित्यिक जागर आणि विचारमंथन होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, सुप्रभा पतसंस्था मर्यादित, मुंबई आणि सुप्रभा वाचनालय, कोंडिवळे यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ जानेवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे. याची सविस्तर माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे हे संमेलनाचे अध्यक्ष असणार असून या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ञ, माजी कुलगुरू प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता किर उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनानिमित्ताने १ जानेवारीला राजापूर एसटी डेपो येथून ग्रंथदिंडीला सुरवात होणार असून पुढे राजापूर जवाहर चौक व ओणी बाजारपेठ अशी ही ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी ९.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी २ वाजता कथाकथन होणार असून यामध्ये कोल्हापूर येथील अप्पासाहेब खोत व सांगली येथील बाबासाहेब परीट हे सहभाग होणार आहेत. सायंकाळी ४.३० वा. वेंगुर्ले येथील वीरधवल परब यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन होणार असून यामध्ये खारेपाटण येथील डॉ. अनिल कांबळी, ओणी येथील संजय कुळये, सावंतवाडी येथील प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, वेंगुर्ले येथील अरूण नाईक सहभागी होणार आहेत. रात्री ८ वा. डफावरची शायरी, गजनृत्य, महिलांची टिपरी-फुगडी, गोंधळ, पालखीनृत्य, भोंडला अशा लोकलांचा जागर होणार आहे.
३ जानेवारीला सकाळी ९ वा. मराठी साहित्यातून प्रकटणारे कोकणातील सामाजिक जीवनाचे चित्रण : किती यथार्थ ० या विषयावर परिसंवाद होणार आहे. सकाळी ११ वा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारख्या’ या गाजलेल्या कवितेचे कवी अनंत राऊत काव्यवाचन सादर करणार आहेत. दुपारी ३ वा. साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ होणार आहे. संमेलनाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी केले आहे.