लांजा:-मॉरिशस येथील विद्यापीठात कोकणातील जाखडी नृत्याचा ऊहापोह करणारा शोधनिबंध सादर करण्यात आला. लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी हा आढावा सादर केला.
मॉरिशस विद्यापीठ, तेथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ तसेच सातारा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अलीकडेच मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये पार पडले. भारत-मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांचा कला, साहित्य आणि संस्कृती यावरील प्रभाव हा चर्चासत्राचा विषय होता. यावेळी इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमधून आलेल्या २५ शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. मराठी साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांज्यातील पदाधिकारी सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी यावेळी कोकणातील जाखडी (मॉरिशसमध्ये झाकरी) : सांस्कृतिक संबंध या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन केले. मुंबई बंदरातून १८४३ साली निघालेल्या जहाजातून १७३ लोक ब्रिटिशांनी मॉरिशस येथे ऊसतोडणीच्या कामासाठी नेले होते. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथील लोकांचा सर्वाधिक भरणा होता. आपली मायभूमी सोडून स्थलांतरित झालेल्या या लोकांचे परतीचे दोर ब्रिटिशांनी कापून टाकल्यामुळे हे लोक तेथेच स्थायिक झाले. मॉरिशस येथील पर्वतीय प्रदेश आणि समुद्रामुळे कोकणासारखेच वातावरण तेथे असल्याने ते लोक पुढे तेथेच रमले आणि तेथे त्यांनी आपली मराठी संस्कृती, धर्म, सणवार, उत्सव, खाद्यपदार्थ यांची जपणूक केली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जाखडी हे लोकनृत्य आजही काही प्रमाणात बदल होऊन तेथे ‘झाकरी’ या नावाने सादर केले जाते. गणेशोत्सवात हे नृत्य सादर केले जाते. या नृत्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. नितीन बापू, बीदेन आबा यांसारखे अनेक लोक या नृत्याच्या संवर्धनासाठी अत्यंत प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर सौ. देवगोजी यांनी जाखडी नृत्याचा आढावा घेणारा शोधनिबंध सादर केला. याशिवाय देवाची आरती करताना गणेश आरतीबरोबरच ‘युगे अठ्ठावीस’ ही विठ्ठलाची आरती न म्हणता कोकणात प्रसिद्ध असणारी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये’ ही आरती मृदुंग, टाळचिपळ्या यांच्या गजरात तेथे म्हटली जाते, अशी माहिती यावेळी सौ. देवगोजी यांना मिळाली.
यानिमित्ताने मॉरिशसच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमधील मराठी विभाग प्रमुख डॉ. मधुमती कुंजला यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लेखकांची विविध साहित्य प्रकारातील पुस्तके सप्रेम भेट म्हणून सुपूर्द करण्यात आली. डॉ कुंजला मॅडम यांच्या मातोश्रीच्या मूळच्या रत्नागिरीच्याच रहिवासी आहेत. भेट दिलेल्या पुस्तकांमध्ये साप्ताहिक विवेकने संपादित केलेले लोकमान्य टिळक यांचे चरित्र, श्रीकृष्ण जोशी यांचे ‘त्रिदल’ हे नाटक, ‘आबूट घेऱ्यातील सूर्य’ हा अरुण इंगवले यांचा कवितासंग्रह, ‘पिपीलिका मुक्तिधाम’ ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी, ‘अजि म्या परदेस पाहिला’ हे विजयलक्ष्मी देवगोजी यांचे प्रवास वर्णन, रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले ‘अशी घडली राजस्विनी’ हे पत्रसंग्रहाचे पुस्तक, ‘सिंधुसाहित्यसरिता’, ‘बीज अंकुरे अंकुरे’, विजय हटकर यांचे माचाळच्या पर्यटनावरील पुस्तक, शिक्षकांसाठी साने गुरुजी इत्यादी पुस्तकांचा त्यात समावेश होता.