रत्नागिरी : राज्यात ८० ठिकाणी रोपवे करून पर्यटनाला चालना देण्याचा महायुती सरकारचा विचार असून त्यातील चार रोपवे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसाठी प्रस्तावित केले आहेत.
त्यामध्ये परशुराम मंदिर ते गोविंदगड व मार्लेश्वर मंदिर ते पायथा असे दोन रोपवे, तर सिंधुदुर्गत आंबोली व गगनबावडा असे दोन रोपवे प्रस्तावित आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन भाजपचे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमोद जठार यांनी चिपळूण तालुक्यात दोन दिवसांचा दौरा केला. यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख अध्यक्ष प्रमोद अधटराव, ज्येष्ठ नेते भागवत काका, बूथ सशक्तीकरण प्रमुख अनिल घोसाळकर, विस्तारक प्रमुख प्रसन्न जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, चिपळूणचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष राम शिंदे, शहर सरचिटणीस निनाद आवटे आदी उपस्थित होते.
जठार म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम स्थानिक खासदारांच्या नाकर्तेपणामुळे रखडले असून केंद्र सरकार येत्या २०२४ पर्यंत तो पूर्ण करील. आपण ग्रामीण भागातील १३० व शहरातील ४० अशा एकूण १७० बूथपर्यंत पोहोचलो. काही बूथची पुनर्रचना केली. बूथ सक्षमीकरण करून येत्या निवडणुकीपर्यंत भाजप अधिक मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येत्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा असून त्यांच्यासोबत येथील खासदार महायुतीचाच खासदार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.