दापोली प्रतिनिधी:- दापोलीतील भोमडी फुगीची नदी या जंगलमय भागात 7 जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 5 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगीची नदी या जंगलमय भागात फिर्यादी गेले होते. यावेळी त्यांना प्राण्यांना मारण्यासाठी छोटे 7 जिवंत गावठी बॉम्ब पेरलेले दिसून आले. याबाबतची खबर त्यांनी दापोली पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना सुपारीचे आकाराचे लहान मोठे जिवंत गावठी
बॉम्ब दिसून आले. त्याची अंदाजे किमत 7,000/- रु. आहे.
कोणीतरी अज्ञात इसमाने स्फोट होणारे सात जिवंत गावठी बॉम्ब, हयगयीचे वर्तन करुन मानवी जिवीतास धोका होईल अशा पध्दतीने तसेच जंगली प्राण्यांची शिकार करण्याचे हेतूने ठेवलेल्या
स्थितीत मिळून आले म्हणून अज्ञात इसमाविरुध्द भा.दं.वि. कलम 286 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.