देवरुख/प्रतिनिधी:- देवरूख- साखरपा मार्गावरील मुरादपुर येथे गुरांची अवैध वाहतुक करणारी बोलेरो पीकअप गाडी बुधवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी दोघांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 4 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजेश वसंत रवंदे (वय 22 वर्षे, रा. सावर्डे, ता. शाहुवाडी), युवराज भिकाजी कांबळे (वय 44 वर्षे, रा. निळे, ता. कोल्हापुर) अशी आरोपींची नावे आहेत. राजेश रवंदे व युवराज कांबळे यांनी एकमेकांच्या संगनमताने बोलेरो पीकअप गाडी ( एमएच 07, पी 1972) मधुन प्राण्यांचा वाहतुक परवाना व ड्रायव्हींग लायसन्स नसताना गाडीच्या हौद्यामध्ये 7 गाई व 1 पाडी या पाळीव जनावरांना वेदना होईल असे आखुड दोरीने बांधुन त्यांना हालचाल करता येणार नाही अशा दाटीवाटीने क्षमतेपेक्षा जास्त भरली होती. या गुरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना मिळुन आले आहेत.
मुरादपुर येथील महाबळेश्वर मंदिर येथे ही बोलेरो पीकअप गाडी देवरूख येथील तरूणांच्या मदतीने देवरूख पोलीसांनी पकडली. 7 गाई, 1 पाडी सह 3 लाख 50 हजार रूपये किमतीची बोलेरो पीकअप गाडी असा एकूण 4 लाख 10 हजार रूपये किमतिचा मुद्देमाल देवरूख पोलीसांनी जप्त केला आहे.
राजेश रवंदे व युवराज कांबळे यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँन्स्टेबल संजय मारळकर करीत आहेत.
साखरपा मुरादपुर येथे गुरांची अवैध वाहतुक करणारी बोलेरो ताब्यात
