रंगकर्मीच्या वतीने सत्कार; मुख्याधिकाऱ्यांचे केले कौतुक
चिपळूण प्रतिनिधी : मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ७० दिवसांत चिपळूणच्या इंदिरा गांधी खांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण केलं आहे. आता अत्याधुनिक असे सुसज्ज सांस्कृतिक केंद्र सुरू झाले आहे. काही बारीकसारीक गोष्टी आहेत. त्यात सुधारणा करता येतील. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे खेड नगर पालिकेचाही कारभार आहे. त्यांनी आता खेडचे नाट्यगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले.
सोमवारी रात्री प्रशांत दामले व कविता लाड-मेढेकर यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग येथे रंगला. यावेळी रंगकर्मीवतीने अभिनेते प्रशांत दामले यांनी वैयक्तिक विश्वविक्रमी १२,८१९ प्रयोग केल्याबद्दल व नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना प्रशांत दामले यांनी अनेक वर्षानंतर चिपळूणमध्ये नाटक होत असलं, तरी चिपळूणचे रसिक आजही जसे दाद देणारे होते तसेच आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्रशांत दामले यांनी चिपळूणच्या नाट्यगृहाविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. मोरूची मावशी नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी आम्ही रंगमंचाच्या डाव्या बाजूला श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. कलाकारांनी नाट्यगृहात सत्यनारायणाची पूजा आयोजित केल्याचा हा एक आठवणीचा अमूल्य ठेवा आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर लवकरच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे चिपळूणची शाखा सुरू होत आहे, अशी घोषणाही परिषदेचे अध्यक्ष या नात्याने श्री. दामले यांनी केली.
यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन, तर डॉ. प्रशांत पटवर्धन व भाऊ कार्ले यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. चिन्मयी मिलिंद परांजपे हिने श्री. दामले यांचे काढलेले पोट्रेत त्यांना दिले. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगडे यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नाट्य संयोजक योगेश कुष्टे, डॉ. प्रशांत पटवर्धन, रंगकर्मी भाऊ कार्ले, दिलीप आंब्रे, संजय कदम, मनीषा दामले, प्राची जोशी आदी रंगमंचावर उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार व पत्रकार योगेश बांडागळे यांनी केले.