नवी मुंबई:-डाळीच्या वाढत्या किमतीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जानेवारीमध्ये चार लाख टन तूर डाळ आणि दहा लाख टन उडीद डाळ म्यानमारमधून आयात करणार आहे.
डाळींच्या पीकाचे क्षेत्र घटल्यामुळे सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादनाची अपेक्षा आहे.
तूर आणि उडीद डाळीची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठा मर्यादा घातली होती. या साठा मर्यादेची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. साठा मर्यादा लावून सुद्धा तूर, हरभरा, मूग आणि उडीद या डाळींच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये डाळींची किरकोळ महागाई १८ टक्के होती. डाळींच्या वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयात शुल्क सुद्धा रद्ध केले होते.
खरीप हंगामात तूर क्षेत्र घटले असून, त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत अन्नधान्याच्या महागाईत वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, तूर लागवडीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत २ दशलक्ष हेक्टरने घसरले आहे. त्यामुळे तूरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यावरच नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने डाळी आयत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वसामान्यांना महागाईपासून मिळणार दिलासा; केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
