मुख्यमंत्री, पालकमत्र्यांना निवेदन
रत्नागिरी:-शासनाकडे असलेल्या नुकसान भरपाई आणि हिमाचल प्रदेशाच्या धर्तीवर वानर, माकडे मारण्यास परवानगीबाबत शिफारशी असलेला अहवाल सरकारने स्वीकारून त्यावर अंमलबजावणी तत्काळ करावी, अशा आशयाचे निवेदन गोळप येथील आंबा बागायतदार अविनाश काळे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील वानर, माकडांच्या उपद्रवाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावर आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी चर्चा होऊन शासनाने याबाबत नेमलेल्या उपसमितीचा फेब्रुवारीमध्ये दौरा होऊन अहवाल समितीला दिला आहे. समितीचा अहवाल शासनाकडे असलेल्या नुकसान भरपाई आणि हिमाचल प्रदेशाच्या धर्तीवर वानर, माकडे मारण्यास परवानगीबाबतच्या शिफारसी असलेला अहवाल सरकारने स्वीकारून त्यावर अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी. गोवा राज्यात शेतीला उपद्रव करणार डुकरे आणि बिहार राज्यात नीलगायी यांना राज्यसरकार शूटरद्वारे मारून शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती बागायतीला उपद्रव करणारे वानर, माकडे, डुकरे शासनातर्फे मारण्यात यावीत. तात्पुरता उपाय म्हणून वानर, माकडे पकडून नसबंदी करून अभयारण्यात सोडण्याबाबत रत्नागिरीतील गोळप येथे प्रात्यक्षिक झाले. त्याबाबत तातडीने वर्कऑर्डर काढून त्याची अंमलबजावणी व्हावी, याबाबतचे निवदेन चिपळूणचे आमदार शेखर निकम, रत्नसिंधु योजनेचे संचालक किरण सामंत यांनाही देण्यात आले आहे.