रत्नागिरी : सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आंबा, काजू बागायतदार फळपीक विमा योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी शासनाने दोन दिवस वाढीव मुदत दिली होती.
याचा लाभ ४ हजार बागायतदारांनी घेतला आहे. त्यामुळे विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या ३४ हजार ६०५ झाली असून, १९ हजार ५९२.६८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेल्या पीकविमा योजनेत कोकणातील काजू व आंबा पिकांचा समावेश आहे. २०२३-२४ या हंगामासाठी यंदा ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत होती. गेले काही दिवस ऑनलाईन नोंदणी करताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम, सिंधुदुर्गतील आमदार वैभव नाईक यांनी केली होती. जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक यांनीही शासनाला ही परिस्थिती पत्राद्वारे कळवली होती.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने ४ आणि ५ डिसेंबर हे दोन दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत वेबसाईट खुली ठेवली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत ३० हजार २५० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. मुदतवाढीचा फायदा उठवत शेतकऱ्यांनी विमा नोंदणीसाठी दोन दिवस गर्दी केली होती. याचा लाभ ४ हजार अधिक बागायतदारांनी घेतला. जिल्ह्यात ३४ हजार ६०५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यामध्ये आंबा बागायतदार २८ हजार २६२ असून, क्षेत्र १५ हजार ६४६ आणि ६ हजार ३४३ काजू शेतकऱ्यांचे ३ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र संरक्षित आहे. विमा हप्त्यापोटी २२ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपये, तर विमा संरक्षित रक्कम २५८ कोटी ७ लाख ३९ हजार रुपये आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये वातावरणातील बदलांचा फटका आंबा, काजू पिकांना बसत आहे. गेल्या आठवडाभरात कमी दाबाचा पट्टा, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वादळं यामुळे अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने पिकांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरीही विमा उतरवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा विमा उतरवणाऱ्यांच्या संख्येत दोन हजारांनी वाढ झाली आहे. तसेच विमा संरक्षित क्षेत्रही वाढले आहे.
दोन दिवसात 4 हजार बागायतदारांनी उतरवला विमा
