सिंधुदूर्ग:-नौदल दिन सोहळा झाल्यानंतर नौदल परिवाराचा विशेष सोहळा तारकर्ली येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल,अभियंता अजित पाटील, तहसीलदार वर्षा झालटे यांना ‘चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ’मेडलने नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
नौदलाच्या इतिहासात असा सोहळा पहिल्यांदाच होत असून भारतीय प्रशासनातील अधिकाऱ्यांना अशा मेडलने पहिल्यांदाच सन्मानीत करण्यात आले.
भारतीय नौदलाने तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला होता. याकामी पुतळ्याच्या स्थापनेसाठी जागा निश्चिती, पर्यायी जागा शोध तसेच अन्य कार्यवाही करण्यात प्रशासनाचे प्रमुख म्हणून मालवण तहसीलदारांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे नौदलाच्या ऑपरेशन डेमोच्या सर्व पैलूंचा नागरी प्रशासनाशी समन्वय साधण्यात तहसीलदार वर्षा झालटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. यावेळी कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थापनाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांचाही नौदलाच्या वतीने चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ मेडलसह ,प्रशिस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल हरी कुमार व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांसह अन्य नौदल अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सुरक्षा आणि सागरी सुरक्षेच्या सर्व पैलूंचा समन्वय साधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील यांनी राजकोट किल्ला वेळेत पूर्ण करण्यात विशेष लक्ष घातले होते. तारकर्ली येथील नौदलाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यातही पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अग्नीशमन दल पथकांचा सत्कार
मालवण शहरात गेले अनेक दिवस राज्यभरातील अनेक अग्नीशमन दलाची पथके नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी दाखल झाली होती. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत या पथकांनी आपापल्या परीने योगदान दिले होते. आज मंगळवारी या सर्व पथकांना मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अभिनव पद्धतीने निरोप दिला. सर्व पथकांना मानपत्र आणि सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
नगरपालिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सर्व पथकांनी आनंद व्यक्त करत आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल नगरपालिकेचे आभार मानले. सर्व अग्नीशमन बंब मार्गस्थ होत असताना पालिकेने भोंगा वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व कर्मचारी यांनी हात वर करून अभिवादन करत निरोप घेतला. या कार्यक्रमाला थोडीशी भावनिक की किनार देखील लाभली होती. मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांचे सर्वांनी आभार मानले.
सिंधुदुर्गात पोलीस,महसूल,बांधकामच्या अधिकाऱ्यांचा नौदलकडून सन्मान
