रत्नागिरी:-कोकण रेल्वेच्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीचे सध्याचे दीनदयाळू प्रकारातील डबे बदलून त्याऐवजी मेमू श्रेणीतील डब्यांची गाडी चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे.
मात्र सध्या आहे ती गाडी दिव्याऐवजी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेऊन प्रस्तावित मेमू गाडी बोरिवली, वांद्रे टर्मिनस किंवा मुंबई सेंट्रलवरून सावंतवाडीपर्यंत चालवून जुनी मागणी पूर्ण करावी, अशा मागणीचे पत्र कोकण विकास समितीने रेल्वेला पाठवले आहे.
पत्रात म्हटले आहे की, आधी दादरपर्यंत जाणारी गाडी दिव्यापर्यंतच ठेवून मध्य रेल्वेने रत्नागिरी, रायगडमधील प्रवाशांना मुंबईबाहेर काढले. आता कोकण रेल्वे दीनदयाळू प्रकारातील डबे बदलून मेमू डबे जोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्याने मेमू चालवणे रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने सोयीस्कर असले तरी प्रवाशांसाठी ते लाभदायक नाही. सध्याच्या डब्यांमध्ये एका डब्यात खाली आणि वर बसलेले प्रवासी धरून साधारण २०० ते २५० जण प्रवास करू शकतात. मेमूमध्ये तशी सोय नसल्यामुळे एका डब्यात जास्तीत जास्त १५० प्रवासीच बसू शकतात. या घटलेल्या क्षमतेचा फटका गर्दीच्या हंगामात प्रवाशांना बसणार आहे. रत्नागिरी- दिवा पॅसेंजर थांबते त्या स्थानकांवर थांबणारी विशेष गाडी होळी आणि गणपती वगळता इतर कोणत्याही गर्दीच्या हंगामात सोडली जात नाही. याही वर्षी सोडलेल्या ख्रिसमस विशेष गाड्यांना रोहा ते खेड दरम्यान कोठेही थांबे दिलेले नाहीत. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्या, दिवाळी, नववर्ष व इतर मोठ्या सुट्ट्यांच्या काळात मेमू झालेल्या रत्नागिरी दिवा पॅसेंजरमधून प्रवास करणे प्रवाशांसाठी मोठे दिव्य असणार आहे. खेड, महाड, माणगाव परिसरातील प्रवाशांना त्याची झळ जास्त प्रमाणात बसणार आहे.
प्रशासनाने रत्नागिरी पॅसेंजर आहे तशीच ठेवून नवीन मेमू गाडीचा वापर सावंतवाडी ते बोरिवली/वांद्रे टर्मिनस/मुंबई सेंट्रल मार्गावर करावा. मेमू गाडीला दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे वसईला इंजिन वळवून घेण्याचा त्रास वाचणार आहे. याचा विचार करता पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची जुनी मागणी पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या वतीने कोकण विकास समितीने केली आहे.
मुंबई सेंट्रल-सावंतवाडी मेमू रेल्वेगाडी सोडण्याची मागणी
