लांजा:-पत्नीला जबरदस्तीने टेम्पोत बसवून तिला हाताच्या ठोश्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पत्नीने पती विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर पतीने देखील पत्नीकडील दहा ते पंधरा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही बाजूकडील एकूण 15 ते 16 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली होती.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा विशाल गुरव (28 वर्षे, रा. धुंदरे, लांजा) हिने केलेल्या तक्रारीनुसार, पतीबरोबर पटत नसल्याने पत्नी पूजा हिने कौटुंबिक हिसाचार व पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. सोमवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पूजा ही औषध घेण्यासाठी लांजा येथे येत असताना पती विशाल रामचंद्र गुरव (28 वर्षे, रा. गोंडेसखल, लांजा) याने कोर्ले तिठा येथे टेम्पो थांबविला आणि आपल्याला टेम्पोत बसण्यास सांगितले. मात्र आपण टेम्पोत बसण्यास विरोध केला असता विशालने जबरदस्तीने आपल्याला टेम्पो बसविले आणि त्यानंतर आपल्या एका हाताने माझी मान दाबून हाताच्या ठोशाने मारहाण केली. तसेच केस पकडून डोके टेम्पोच्या केबिनवरील डिस्कवर आपटले. पत्नी पूजा गुरव हिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती विशाल गुरव याच्यावर भा.द.वि. कलम 498, (अ), 365, 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर विशाल रामचंद्र गुरव याने केलेल्या तक्रारीनुसार, पत्नी पूजा गुरव हिला आपण टेम्पोतून घरी जात असताना रितेश गुरव याने आपल्या डोक्यावर हाताच्या ठोशाने मारहाण केली. रितेश याचा मोठा भाऊ तसेच बाबा धावणे व अन्य 15 जणांनी आपल्याला जमिनीवर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश तुकाराम गुरव, बाबा धावणे तसेच रितेश याचा मोठा भाऊ व इतर 14 अशा एकूण 15 जणांवर भा.द.वि. कलम 143, 147, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत.