रत्नागिरी:-शासकीय कार्यालयात कागदपत्र पुढे ढकलण्यासाठी वशिलेबाजी पाहायला मिळत आहे. मात्र आता राज्य शासनाने यावर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे. यासाठी राज्यात 1 तारखेपासून ‘प्रथम प्राप्त-प्रथम निर्गत’ ही योजना तहसीलदार कार्यालयांमध्ये लागु केली आहे. यामुळे आता वशिल्याने पुढे सरकणाऱ्या अर्जांना चाप बसणार असुन प्रथम येणाऱ्या अर्जालाच प्राधान्य दिले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 9 तालुक्यात ही योजना लागू झाली आहे.
नागरिकांकडुन आलेल्या अर्जांचा निपटारा दिलेल्या मुदतीतच पुर्ण करण्याकडे संबंधित विभागाचे लक्ष असणार आहे.
तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याकडील ई-फेरफार मंजूर करतेवेळी ‘प्रथम प्राप्त प्रथम निर्गत’ अर्थात ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ (फिफो) ही योजना लागू केली होती. आता राज्यातील सर्व तहसीलदारांच्या पातळीवरही प्रथम प्राप्त प्रथम निर्गत ही योजना 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे. या सुविधेमुळे तहसीलदार यांच्याकडील कलम 155 नुसार सात-बारा उताऱ्यातील दुरुस्ती आदेश, पोटहिस्सा निर्माण करणे आदी कामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या स्तरावर (फिफो) यंत्रणा लागू करण्यात आली आहे. त्यांचा चांगला परिणाम दिसून आला. फेरफार उता-यावर नोंदी घेण्याचा कालावधी कमी होऊन तीस दिवसांवर आला आहे. पूर्वी याच कामांसाठी किमान चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागत होता. तसेच दाखल अर्जाच्या क्रमांकानुसारच ते मार्गी लागण्याचे प्रमाणदेखील वाढले असून, महसूल कामकाजात एक प्रकाराची शिस्त आल्याचे दिसून येत आहे.