संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाकडून (+२स्तर) आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिराची सांगता साखरपा-कोंडगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. समारोपाच्या कार्यक्रमास कोंडगावच्या सरपंच प्रियांका जोयशी, ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये, माजी ग्रामपंचायत सदस्य मंदार आठल्ये, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कबनुरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रताप सावंत, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिबीरातील कार्याचा आढावा कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा शेट्ये यांनी घेतला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल शिबीरार्थी व प्राध्यापकवृंदाचे अभिनंदन केले. प्रताप सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या श्रमांचे कौतुक करून पुढील वर्षीच्या शिबीरासाठी मदत जाहीर केली. ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध वर्तणूकीचे कौतुक केले. कृष्णकुमार भोसले यांनी शिबीरातील विविध उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. स्मिता गौड(सहायक शिक्षण संचालक, कोल्हापूर), प्रा. राजेंद्र कोळेकर(विभागीय समन्वयक), प्रा. लक्ष्मीकांत पाटील(जिल्हा समन्वयक) यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचे व स्वयंशिस्तीचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांनी केलेल्या उत्तम आयोजनाचे कौतुक केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मनिष शिगवण तसेच उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून अस्मिता जवंजाळ व शेजल वास्कर यांना गौरविण्यात आले. शिबीरात घेण्यात आलेल्या वादविवाद, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, अंताक्षरी, संगीत खुर्ची आणि इतर सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांनाही पुरस्कृत करण्यात आले. स्नेहा शेट्ये, सई नर, सानिका पांगळे, मनाली चव्हाण, मनिष शिगवण या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. मयुरेश राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या व शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा.अभिनय पातेरे, सहाय्यक अमोल वेलवणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.