रविवारी अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा
चिपळूण / प्रतिनिधी:-तालुक्यातील अलोरे गावची पन्नास वर्षांपूर्वीची एक ओळख ‘वाशिष्ठीनगर’ अशी ओळख होती. तिच्या दुर्मीळ नोंदीसह पंचक्रोशीतील विविधांगी ऐतिहासिक व दुर्मीळ माहितीचा भरगच्च दस्तऐवज असलेल्या आणि कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या १९१७ ते २०१२पर्यंतच्या सचित्र इतिहासाची मांडणी असलेल्या मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) शाळेच्या १५२ रंगीत पानांसह ४३६ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. १० डिसेंबर) शाळेच्या प्रांगणात होत आहे. मान्यवरांच्या लेखनासह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांच्या लेखनाने समृद्ध असलेली ही स्मरणिका महाराष्ट्रातील ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासात वेगळी वाट शोधू पाहाते आहे.
रविवारी सायंकाळी ४ ते ६ या ‘पद्मश्री’ भिकुजी तथा दादा इदाते यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड, सौ. अलका लाड आणि कुटुंबीय, सौ. व श्री. अमित मोरेश्वर आगवेकर तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ‘एअर मार्शल’ हेमंत भागवत (निवृत्त), कार्याध्यक्ष मकरंद जोशी, सेक्रेटरी डॉ. संजय मोने, अलोरे शाळा समिती चेअरमन पराग भावे, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांची विशेष उपस्थिती राहाणार आहे. स्मरणिकेचे संपादन शाळेच्या दहावी १९९५ बॅचचे माजी विद्यार्थी, लेखक-पत्रकार धीरज मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांनी केले आहे. निर्मिती ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अरुण केशव माने, ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शंकर वहाळकर यांनी केली आहे.
स्वर्गीय मो. आ. आगवेकर हे या शाळेचे, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापक पदावर सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्त्व होते. २०१८च्या मो. आ. आगवेकर नामकरण सोहोळ्यात शाळेने ‘श्रद्धा सुमन’ स्मरणिका प्रकाशित केली होती. तेव्हा ‘स्मृतिशलाका’ सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे बीज रोवले गेले होते. जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांना अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते आहे. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या या डॉक्युमेंटेशनला विशेष महत्व आहे. १९५० ते १९९९ हा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध अलोरे येथे वास्तव्य केलेल्या अनेकांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा कालखंड राहिला आहे. या कालखंडातील इथल्या चाळवजा वसाहत संस्कृतीतील जगणे आणखी काही वर्षांनंतर एक दंतकथा बनून राहील इतके एकमेकांत मिसळलेले होते. नामकरण समारंभानंतर शाळेने विविध बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने अलोरे पंचक्रोशीतील चाळ संस्कृतीतील आठवणींचे उत्खनन करीत ‘स्मृतिरंजन’ करणाऱ्या ऐतिहासिक साधनांच्या लेखन-संकलनावर भर दिला होता. जितके संकल्पित रेकॉर्ड मिळवून तपासून ही स्मरणिका करायची ठरलं होतं त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला आहे.
या स्मरणिकेत अलोरे शाळेच्या उभारणीत सहभाग असलेले आणि पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या’ स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३)ने सन्मानित शास्त्रज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा शुभसंदेश, शाळेचे सुवर्णमहोत्सवी गीत, शाळेचे मागील पन्नास वर्षातील दहावी-बारावीचे प्रथम यशाचे मानकरी, यशवंत व्यासपीठ कराड वक्तृत्व स्पर्धा, सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार विजेते आदींच्या नोंदी पाहायला मिळतील. ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये, निवृत्त एअरमार्शल आणि परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हेमंतजी भागवत यांचे ‘शिक्षण’ या विषयावरील चिंतनशील लेख यात आहेत. शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड यांनी अत्यंत मनमोकळ्या शब्दात दुबईतील आपल्या कार्यक्षेत्रासह अलोरे गावातील प्रेरक आठवणी लिहिल्यात. ‘गुरुवर्य’ मा. ना. कुलकर्णी यांचे स्मरण, शाळेचे नूतन वास्तू उद्घाटन, शाळेचा रौप्य महोत्सव, शाळेची आठवणीतील गॅदरिंग, विविध कार्यक्रम-उपक्रम, पारितोषिक वितरण समारंभ, प्रशस्तिपत्रके, दहावीच्या विविध बॅच, शाळेची बदलती लेटरहेड्स, शाळेचे वाचनालय, वृत्तप्रसिद्धी, सुवर्णमहोत्सवी छायांकित दर्शन आदी ‘सचित्रस्मृति’रंजक ठेवा यात आहे. शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या पहिल्या अध्यक्षांसह अभियंता मनोगते, पालक मनोगते, ग्रामस्थ मनोगते, मुख्याध्यापक मनोगते, आजी-माजी शिक्षक-कर्मचारी मनोगते, ५४ आजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते व कविता, ४९ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते आणि अलोरे शाळेचा कोयना प्रकल्पीय पूर्वेतिहास कथन करणारी ‘एका शाळेची गोष्ट’ यात वाचायला मिळेल. स्मरणिकेच्या दस्तऐवजीकरणात अलोरे गावाचा १८७०चा नकाशा, ऐतिहासिक घराणे ‘चंद्रराव’ मोरे यांची कोकणातील एकमेव मंदिर’स्मृति’ सांभाळणाऱ्या अलोरे गावची पूर्वपीठिका, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा मागील शंभर वर्षांचा सचित्र ‘शोधक’ आढावा, परशुराम सहकारी साखर कारख्यान्यासह मंदार एज्युकेशन संकुल ‘स्मृति’दर्शन, आठवणीतील अलोरे-कोळकेवाडी पंचक्रोशी, एस.टी. प्रवासाची तिकिटे-पासेस, नाट्यसंस्कृती, चलतचित्र विभागाचे डोअर पासेस, प्रकल्प रुग्णालयासह पोस्ट ऑफिसच्या नोंदी, गणेशोत्सवाच्या मागील पन्नास वर्षांच्या अनुषंगिक आठवणी, विविध दुकानदारांची दुर्मीळ बीले संग्रहित केली आहेत. यावरून या स्मरणिकेची व्याप्ती ध्यानात यावी. ‘स्मृतिशालाका’ स्मरणिकेचे स्वागतमूल्य एक हजार रुपये असणार आहे.
अंकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रे ही शाळेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि सातारा येथील प्रसिद्ध चित्रकार संजय भागवत यांची आहेत. अंकाची मांडणी सानिया डीटीपीच्या मुखत्यार मुल्लाजी यांनी तर छपाई कोल्हापूर येथील मिरर प्रिंटींग प्रेस यांनी केलेली आहे. अलोरे शाळेचे एक अर्धशतक संपले आहे. दुसरे सुरु झाले आहे. दोन्ही अर्धशतकात खूप मोठी तफावत असणार आहे. म्हणून अशा प्रकारचे दस्तऐवज करणे आवश्यक ठरते. शाळेचा विद्यार्थी वर्ग जगभर पसरला आहे. त्याला जोडण्याचा शाळेने सुरु केलेला प्रयत्न पुढील काळात अव्याहतपणे चालू ठेवण्यात ही स्मरणिका योगदान देईल. शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यास शिक्षणप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक आणि ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे प्रकाशक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२१२२७८५२, ९४२१२२७७१३ येथे संपर्क साधावा.