रत्नागिरी:-सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी आणि कोड ऑफ एथिक्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सीएंचा चांगला प्रतिसाद लाभला.
हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह येथे कार्यशाळा झाली. प्रास्ताविक करताना सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नगिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे म्हणाले की, एका अर्थाने आजचे सेमिनार आत्मनिर्भर सेमिनार म्हणता येईल. कारण आजचे दोन्ही वक्ते सीए वैभव देवधर व सीए अक्षय जोशी स्थानिक असून या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. जिल्ह्यात असे सुमारे १०-१२ तज्ज्ञ मार्गदर्शक सीए उपलब्ध आहेत. त्यामुळे असे दोन-तीन कार्यक्रम आयोजित करण्याचा कमिटीचा मानस आहे. गेल्या वर्षभरात कमिटीने ६० सीपीई तासांचे कार्यक्रम आयोजित केले. ई-न्यूजलेटर सुरू केले. शाखेचे कार्यालयही नवीन जागेत सुरू झाले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व चिपळूणच्या डीबीजे कॉलेजमध्ये लवकरच अकौंटिंग म्युझियम सुरू होणार आहे. करोनामुळे ज्या कुटुंबातील कमावता सदस्य मृत्युमुखी पडला अशा २ पाल्यांची सीए नोंदणी शाखेतर्फे मोफत करून देण्यात आली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सीए वैभव देवधर यांनी जीएसटी कायद्यातील बदल, जीएसटी डिपार्टमेंटल ऑडिट आणि असेसमेंट्स आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जीएसटीमधील महत्त्वाचे निर्णय याबद्दल मार्गदर्शन केले. सीए अक्षय जोशी यांनी कोड ऑफ एथिक्सबद्दल माहिती दिली.
सीए अक्षय जोशी यांनी सीएंनी प्रॅक्टिस करताना पाळावयाचे नियम व बंधने, त्यामध्ये झालेले बदल तसेच सीए आणि इतर प्रोफेशनल यांनी एकत्र येऊन केलेली पार्टनरशिपसंबंधी नियम याविषयी मार्गदर्शन केले. सी ए इन्स्टिट्यूटने आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळले जाणारे नियम भारतीय सीएसाठीसुद्धा लागू केले आहेत, जेणेकरून भारतीय सीए प्रोफेशनची गुणवत्ता राखली जाईल. फक्त अकाउंट्स, ऑडिट यात अडकून न पडता सीएना आपल्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्या व्यावसायिकांना सर्वंकष सल्ला देता यावा, तसेच एकाच छताखाली विविध प्रकारच्या सेवा देता याव्यात यासाठी सीए इतर प्रोफेशनल जसे सीएस, आर्किटेक्ट, इंजिनियर यांच्यासोबत पार्टनरशिप करता येऊ शकते आणि सेवा देता येऊ शकतात. त्यासाठी पाळावे लागणारे नियमदेखील सीए इन्स्टिट्यूटने आमलात आणले आहेत, असे त्यांनी सांगितले.
शाखेच्या उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला व्यासपीठावर सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन सीए मीनल काळे यांनी केले. सीए केदार करंबेळकर यांनी आभार मानले.
रत्नागिरीत सीए इन्स्टिट्यूटतर्फे जीएसटी, कोड ऑफ एथिक्सवर कार्यशाळा
