कणकवली:-तालुक्यात कोंडयेमध्ये एका काजू बागेच्या ठिकाणी सोमवारी दुपारी बिबट्या आढळला. हा बिबट्या लोकांच्या वर्दळीनंतर देखील पळून जात नसल्याने तो जखमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.त्यातच तेथील एका स्थानिकाने तर बिबट्यापासून काही फूट अंतरावर जाण्याचा स्टंट देखील केला. मात्र सुदैवाने त्या बिबट्याने या साऱ्या प्रकारानंतर देखील शांत राहण्याची भूमिका घेतल्याने हा बिबट्या जखमी असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली.
त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवून घेण्यात आले. या कालावधीत काही काळ बिबट्या पुन्हा जंगल भागात पसार झाला. दरम्यान या बिबट्या सोबत एक छोटे पिल्लू देखील तिथे काही ग्रामस्थांना दिसले. दरम्यान सरपंच ऋतुराज तेंडुलकर व ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली. पण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा पर्यत व आज मंगळवारी सकाळच्या सत्रात ही या ठिकाणी पाहणी केली. वन विभागाचे वनपाल कोळेकर यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान हा बिबट्या वयोवृद्ध झाला असण्याची शक्यता श्री कोळेकर यांनी वर्तवली. किंवा सदर बिबट्या भुकेने व्याकुळ झाल्याने देखील तो थकला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कालपासून वनविभागाकडून या बाबत गस्त सुरू आहे. अशी माहिती कोळेकर यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील कोंडयेमध्ये भरदिवसा काजू बागेत बिबट्याचे दर्शन
