२४ डिसेंबरला उदघाटन सोहळा;केंद्रीय मंत्र्यांसह उद्योग मंत्र्यांची उपस्थिती
रत्नागिरीःरत्नागिरी एज्युकेशान सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेचा अमृत महोत्सव समारंभ दि. २४ व २५ डिसेंबर रोजी प्रशालेच्या सौ. विजयालक्ष्मी मलुष्टे रंजनमंदिर मध्ये साजरा केला जाणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळयाला उद्योग मंत्री ना. उदय सामंत ,माजी शालेय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे,चितळे उद्योगसमुह पुणेचे श्री. संजय चितळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहाणार आहेत. तर महोत्सवाचा समारोप दि. २५ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता केंद्रीय बंदरे व पर्यटन मंत्री तथा सोसायटीचे अध्यक्ष ना. श्रीपाद नाईक,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
र. ए. सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेला ७५ वर्षे पुर्ण होऊन शाळेने अमृत महोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे.सन १९४८ साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने ट्युटोरियल स्कूल चालविण्यासाठी आपल्या ताब्यात घेतले. त्यावेळी कै. रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून व्युटोरियल स्कूलचे नामकरण रा. भा. शिर्के प्रशाला असे करण्यात आले. आज प्रशालेने सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत जनमानसात वेगळा ठसा उमटवल्याचे आपण अनुभवत आहोत. याचे सर्व श्रेय संस्थेचे आजवरचे सर्व संस्थापक, पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जागरूक पालक वर्ग आणि प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी या सर्वांना आहे.
शालेय उपक्रमांबरोबरच शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये (शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस., गणित प्रज्ञाशोध, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा) सातत्याने मिळणाऱ्या घवघवीत यशाची तसेच दहावी बोर्डाच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा शाळेने जपली आहे. क्रीडा क्षेत्रात शाळेचा कायम दबदबा असतो. शाळेचे प्रशस्त क्रीडांगण अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत आहे. दिल्ली येथे होणाऱ्या आर.डी. परेडसाठी सलग दोन वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य प्रशालेला लाभले आहे. तसेच शासनामार्फत प्रशालेला अटल टिंकरींग लॅब मंजूर झाली आहे. या लॅबमधील विविध वस्तूंचा उपयोग करून रोबोट बनविणे, थ्रीडी प्रिंटर चालवणे, लॅपटॉपच्या आधारे प्रोग्राम बनविणे या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे.
‘ही आवडते मज मनापासूनी शाळा । लाविते लळा ही जसा माऊली बाळा ।।’ असा अनुभव देणारी आमची कै. ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी ही शाळा जून १९९५ मध्ये सुरू झाली. संस्थेचे तत्कालीन कार्याध्यक्ष कै. अरुअप्पा जोशी यांनी शिक्षण क्षेत्रातील भविष्याचा वेध घेऊन हे विद्यामंदिर सुरू केले. आज या शाळेने आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे. गुरुकुल प्रकल्प हे प्रशालेचे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पाऊल. पंचकोशाधारित सर्वांगीण शिक्षण देणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे उत्तम, गुणवंत विद्यार्थी शाळा घडवत आहे. अनेक विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदावर काम करत आहेत. ही गौरवास्पद बाब आहे. या सर्व गुणवान विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाळेचे सर्व माजी विदयार्थी,सेवानिवृत शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्रीत येऊन हा महोत्सव साजरा करणार आहेत . रविवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ८. ३० ते १०.००या वेळेत उपस्थितांची नोंदणी व चहापान. सकाळी १० वाजता मुख्य उदघाटन समारंभ होईल. भोजनानंतर दुपारी २. ३० ते ४. ०० माजी विदयार्थी यांचा गाण्याचा कार्यक्रम,सायं. ४ ते ५. ३० शिक्षकांचे सांस्कृतीक कार्यक्रम,सायं ५. ३० ते ७. ३० माजी विदयार्थ्याचे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न होतील.
सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० चहापान,सकाळी १० ते ११ माजी शिक्षकांचा सत्कार,सकाळी ११ ते १२ शिक्षकांचे सांस्कृतीक कार्यक्रम,दुपारी १२ ते १. ३०माजी विदयार्थ्याचा सांस्कृतीक कार्यक्रम।जेवणानंतर दुपारी ३ ते ४ शिक्षकांचे सांस्कृतीक कार्यक्रम. सायं. ४ वाजता मुख्य समारोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दोन दिवस होणाऱ्या शाळेच्या अमृत महोत्सव समारंभाला उपस्थित राहाण्याचे आवाहन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन,उपकार्याध्यक्ष तथा शिर्के प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष ऍड. विजय साखळकर,कार्यवाह श्री. सतीश शेवडे,सह. कार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर, शिर्के प्रशाला कनिष्ट महाविदयालय शालेय समितीचे अध्यक्ष श्री. मनोज पाटणकर,मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण यांनी केले आहे.