गुहागर- गुहागर तालुक्यातील नरवण येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाचे बचाव पथकाने सुखरूप बाहेर कढून नैसर्गिक आधिवासात मुक्त केले.
आज सकाळी नरवण येथील सुतारवाडी मधील उपेंद्र नाटूसकर यांच्या मालकीच्या विहिरी मध्ये बिबटया पडला असल्याची माहिती
वनविभागाला दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल चिपळूण राजश्री कीर व त्याचे अधिनस्त कर्मचारी वनविभागाचे बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले व सदर बिबट्यास काही वेळात लोखंडी पिंजरा व दोरीच्या सहाय्याने सुखरूप विहिरीबाहेर काढले.
विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकिय
अधिकारी, गुहागर यांचेकडून बिबट्याची वैद्यकिय तपासणी करून
घेतली असता, सदर बिबट्यांची तब्येत सुस्थितीत असल्याचे वैद्यकिय अधिकारी सांगितले. सदर बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे अंदाजे वय अडीच ते तीन वर्षे आहे. सदर बिबट सुस्थितीत असल्याने, सदर बिटट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले.
सदरचे बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक (अ.का), रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण, संतोष परशेट्ये, वनपाल गुहागर, राजाराम शिंदे, वनरक्षक रामपूर, राहूल गुंठे, वनरक्षक कोळकेवाडी, संजय दुडंगे, वनरक्षक अडूर, अरविंद मांडवकर वनरक्षक रानवी यांनी सक्रिय कामकाज करत बिबट्याला पोलीस कर्मचारी पोलिस पाटिल नरवण, स्थानिक व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.