रत्नागिरी:-विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या समाजाच्या मागण्या गोंधळाद्वारे मांडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन देऊन शासनापर्यंत आपल्या भावना पोहचवण्याची मागणी केली.
विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय मारूती कदम यांच्या न मार्गदर्शनाखाली हा मोर्चा मारूती मंदिरहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. एनटी (बी) चे आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी आहे. एनटी (बी) चे आरक्षण वाढले पाहिजे, एनटीबीला जिल्ह्यात जास्त जागा पाहिजेत या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला जिल्ह्यातील समस्त विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज व सरोदे, गोंधळी, जोशी, नंदीवाले, नाथपंथी, डवरी, गोसावी, वडार, भोरपो, एनटी (बी) समाजाचे बांधव उपस्थित होते. केंद्र सरकारने राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे की, राज्यातील भटक्या विमुक्तांचा सव्र्व्हे करून तो डाटा केंद्र शासनाला पाठवा. त्याचा जो खर्च असेल ते केंद्र शासन देईल; पण राज्य सरकार अजूनही भटक्या विमुक्तांचा सव्र्व्हे करत नाही. भटक्या विमुक्तांच्या सर्व योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर येथे मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा काढण्यात आला. मोर्चा कोणाच्याही विरोधात नसून, हा मोर्चा भटक्या विमुक्तांचे समस्या व त्यावर उपायसंदर्भात आहे.
या मोर्चाला जिल्ह्यातून मंडणगड, खेड, गुहागर, दापोली, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर असे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून समाजबांधव येणार होते; परंतु कमी प्रमाणात समाज आला. आंदोलन संविधानाचे पालन करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाले. गोंधळी समाजाने गोंधळाच्या रूपात समाजाच्या मागण्या प्रशासनापुढे मांडल्या. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले.