उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
संगलट,खेड/इक्बाल जमादार:-माणगाव तालुक्यातील मांजरवणे गावातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा सर्पदंशानंतर उपचारादरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी घडली. या घटनेतील महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून तशा प्रकारची तक्रार मयत महिलेचा दिर महेफुज म. अली हर्णेकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडून महिलेच्या नातेवाईकांनी व जमावाने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे जमुन उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. वेळीच माणगाव व गोरेगाव पोलिस घटनास्थळी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होवून त्यांनी परीस्थीती
आटोक्यात आणली. पोलिसांनी नातेवाईकांची समज काढून त्यांना कायदेशीर मागनि जाण्याचा सल्ला
दिला.सदर घटनेबाबत अधिक वृत्त असे की, घटनेतील मांजरवणे गावातील विवाहिता दनिया हाशिम हर्णेकर (वय २४) या महिलेला सोमवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता विषारी सपनि पायाला दंश केला. यानंतर तिला लगेचच
तिच्या घरच्या मंडळींनी सकाळी ८:३० वाजता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर औषधोपचार सुरू असताना दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी तेथील डॉक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे घोषित केले. त्यांनतर सदर महिलेचे पती, आई, वडील, दिर व अन्य नातेवाईक यांनी ढसाढसा रडून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांबद्दल संतप्त
भावनाव्यक्त केल्या. पोलीस घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने पुढील बाका प्रसंग टळला. मयत महिलेचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णवाहिकेत माणगावात होता. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी देऊन शवविच्छेदनानंतर या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजेल असे सांगितले.
“उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या वहिनीचा मृत्यू झाला आहे. सकाळी ८:३० बहिनीला येथे आणल्यावर कोणीच डॉक्टर नव्हते. त्यांनतर ९:१५ वा डॉक्टर येवून त्यांनी उपचाराला सुरुवात केली. वहिनीची प्रकृती जास्त गंभीर झाल्याने येथील डॉक्टरांनी उशिरा दुपारी एम. जी.एम. हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगितल्यावर आम्ही त्वरित रुग्णवाहिकेतून पुढे नेण्याचा निर्णय घेतल्यावर तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातच वहिनीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेझाल्याने त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.” – महेफुज हर्णेकर, मयत महिलेचा दिर
“या घटनेतील रुग्ण महिला दानिया हाशिम हर्णेकर ही २४ वर्षीय
महिला सर्प दंश झाल्याने सकाळी ९:१५ वाजता रुग्णालयात दाखल झाल्यावर फिजिशियन डॉक्टरांनी तिच्यावर लगेचच औषधोपचार सुरू केले. आवश्यक ती सर्व औषधे वापरण्यात आली परंतु तिच्याकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. तिच्यावर उपचार करीत असताना आम्ही वेळोवेळी तिच्या संबंधित नातेवाईकांशी बोलून तसेलिहून घेऊन त्यांची सही देखील घेतली आहे.” – डॉ. सचिन गोमसाळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव