खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका गावात बापाने पोटच्या 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र महादेव घाणेकर (45) असे नराधम बापाचे नाव आहे. घटनेनंतर फरार झालेल्या बापाला पोलिसांच्या 4 पथकांनी जंगलमय भागात कसून शोध घेत जेरबंद केले.
14 सप्टेंबर ते 2 डिसेंबर याकालावधीत ही घटना घडल्याचे पिडित मुलीच्या आईने येथील पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. पतीने लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पिडित मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केल्यानंतर तो फरार झाला होता. या घटनेने खळबळ उडाली होती.
याबाबत रितसर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक राजश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी फरारी बापाच्या शोधार्थ 4 पथके ठिकठिकाणी जंगलमय भागात रवाना करत परिसर पिंजून काढला. मात्र तरीदेखील फरारी बापाचा थांगपत्ता लागला नव्हता.
येथील पोलिसांची 4 पथके जंगलमय भागात तळ ठोकून होती. अखेर रविवारी रात्रीच्या सुमारास येथील पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. येथील न्यायाधीश रजेवर असल्याने पोलीस कोठडीसाठी नराधम बापास सोमवारी चिपळूण येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. याबाबत पुढील माहिती समजू शकली नाही.
बापाने केला पोटच्या मुलीवर बलात्कार
