रत्नागिरी:-येथील आस्था सोशल फाउंडेशन या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून या वर्षापासून दिव्यांग आधार पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
यावर्षी क्वालिटी स्क्रीन्सच्या संचालिका वनिता विलास परांजपे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
क्वालिटी स्क्रीनचे संचालक जितेंद्र जोशी आणि वनिता परांजपे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या व्यवसायात सहा मूकबधिर दिव्यांगांना नोकरी दिली आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसताना त्यांनी आपले कर्तव्य समजून त्यांना आपल्या व्यवसायात सामावून घेतले आहे. अशाच प्रकारची प्रेरणा घेऊन इतरही छोट्या मोठ्या उद्योगात उद्योजकांनी दिव्यांगाच्या क्षमतांनुसार त्यांना सामावून घेतल्यास अनेक दिव्यांग सन्मानाने उदरनिर्वाह करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. त्यांची प्रेरणा घेऊन अशी अनेक उदाहरणे समाजात निर्माण व्हावी, यासाठी आस्था सोशल फाउंडेशनने हा पुरस्कार यावर्षीपासून सुरू केला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख ५००० रुपये असे आहे. दिव्यांग आधार पुरस्कार संस्थेच्या सचिव सुरेखा पाथरे, आस्था दिव्यांग हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक शसंकेत चाळके, आस्था थेरपी सेंटर प्रमुख श्रीमती संपदा कांबळे, खजिनदार साक्षी चाळके, आल्हाद पाथरे यांनी वनिता परांजपे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रदान केला. याप्रसंगी क्वालिटी स्क्रीनमध्ये कार्यरत मूकबधिर दिव्यांगांचादेखील सन्मान करण्यात आला.