हर्णे – पुन्हा एकदा हर्णे बंदराच्या समोरील समुद्रात मुरुड पासून सुवर्णदुर्ग पर्यंतच्या भागात एल. ई. डी व पर्ससीननेट व फास्टर नौका प्रचंड प्रमाणात राजरोसपणे घुसखोरी करून अवैध मासेमारी करत धुमाकूळ घालत आहेत.
किमान ४ ते ५ नॉटिकल मैलाच्या अंतरावरच जोरदार अवैध मासेमारी करत आहेत.
रोजच्या किमान ८० ते १०० नौका मासेमारी करत असतात. परंतु धनदांडग्यांच्या तसेच मंत्र्यांच्या नौका असल्याने शासन मात्र हातावर हात घेऊन बसले आहे. या नौकांच्या घुसखोरीवर यंत्रणा काहीच करत नाही. त्यामुळे येथील मच्छीमारांमधून यंत्रणेबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गेले कित्येक दिवसांपासून हर्णे बंदर येथील मुरुड ते सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात परप्रांतिय फास्टर बोटी, पर्ससीन नेट आणि एल. ई. डी नौका मासेमारी करणाऱ्या बोटी या आपली मासेमारी करण्याची हद्द ओलांडून समुद्र किनाऱ्यापासून ४ ते ५ नॉटिकल मैलाच्या अंतराच्या आतच बिनधास्तपणे मासेमारी करत आहेत.
असे असतानाही अशा गैरप्रकाराला शासनयंत्रणा प्रतिबंध का बरं करत नाही? अधिकारी वर्ग कोणाच्या तरी आशिर्वादाने हे सर्व करत आहेतच किंवा अधिकारी वर्गाचे आर्थिकदृष्ट्या पारडं तरी जड झाले असल्याचा दाट संशय आहे अश्या संतप्त प्रतिक्रिया येथील मच्छीमारांमधून व्यक्त होत आहेत.
दापोली तालूक्याची मासेमारी उद्योगामधील आर्थिक राजधानी म्हणून हर्णे बंदर हे ओळखलं जातं. याठिकाणी रोजची करोडो रुपयांची उलाढाल होत होती. हळूहळू ही उलाढाल आता मात्र गेल्या सात ते आठ वर्षात खूपच कमी होऊ लागली आहे. याला समुद्रात चाललेली सर्वच प्रकारची अवैध मासेमारी कारणीभूत ठरते आहे.
गेली दहा वर्षे येथील पारंपरिक मच्छीमार एल. ई. डी , फास्टर आणि पर्ससीननेट मासेमारी विरोधी अनेक प्रकारे लढत आहे. त्यावर अनेक कायदे होऊन देखील आजपर्यंत काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही.
या बंदरात साधारणपणे आजूबाजूच्या गावातील मिळून १००० च्या आसपास मासेमारी नौका आपला मासेमारीचा व्यवसाय करतात. येथील पाजपंढरी गावात तर मच्छीमार समाजाचीच खुपच मोठी वस्ती आहे. प्रत्येक कुटुंब हे मासेमारी या व्यवसायावरच अवलंबून आहे. मासेमारी हाच येथील लोकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय आहे.
समुद्राच्या काठावर राहणारे मासेमारी करणारे लोक हे पूर्वीपासूनच आपला पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय करत आले आहेत. या मच्छीमारांकडे ना फास्टर बोटी ना पर्ससीननेटव्दारे मासेमारी करणाऱ्या महागडया किंमतीच्या बोटी ते आपला मासेमारीचा व्यवसाय पारंपारिक बोटींच्या सहाय्यानेच करत आहेत.
मात्र परप्रांतिय फास्टर आणि पर्ससीन नेटव्दारे नौकांकडून हर्णे बंदर येथील मुरुड ते सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात गेल्या कित्येक दिवसापासून खूपच जवळपासच्या भागात जोरदार अवैध बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. दिवसा एल. ई. डी नौका तर रात्रीच्या फास्टर नौका घुसखोरी करतात.
परप्रांतिय फास्टर नौका, एल. ई. डी आणि पर्ससीनेटव्दारे करण्यात येणा-या नौकांकडून अगदी सर्व जातीचे लहान मोठे मासे मारले जातात. त्यामुळे हर्णे बंदरामध्ये हळुहळु मत्स्यदुष्काळ चांगल्याच प्रकारे जाणवू लागला आहे.
निव्वळ अवैध मासेमारीमुळे हर्णे बंदरामध्ये मासळी दुष्काळ निर्माण होतोय तर येथील मच्छीमाराने विविध वित्तिय संस्था तसेच उधार उसनवार करून अथवा सोनं नाणं गहाण ठेवून धंदयासाठी आणि कामगारांसाठी केलेल कर्ज कस भरणार अशी चिंता येथील मच्छीमारांना लागून राहिली आहे. शासन यंत्रणाच कुचकामी ठरल्याने मच्छिमार बांधव मोठ्या आर्थिक संकटात अडकत चालला आहे. आणि त्यामुळेच येथील पारंपारिक मच्छिमार हवालदिल झाला आहे.
रोजच्या या भागात १०० च्या आसपास या सर्व प्रकारच्या अवैध नौका मासेमारी करत असतात. एल.ई. डी मासेमारी ही बेकायदेशीर च आहे परंतु पर्ससीननेट आणि फास्टर पण २२ नॉटिकल मैलाच्या आतच मासेमारी करत असतात. याबाबत मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना कळवले असता त्यांच्याकडून कारवाईबाबत समाधानकारक उत्तर मिळतच नाही.
तसेच जरी आम्ही शासनाला या नौकांना पकडून दिले तरी शासन यांच्यावर क्षुल्लक दंडात्मक कारवाई करून सोडून देते. म्हणून आम्ही कोणताच पवित्रा घेत नाही. आणि शासनाचेच हात देखील यामध्ये बरबटलेले आहेत. या विरोधात आम्ही सर्व मच्छीमारांनी दिल्ली येथे जाऊन तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना देखील याबाबत सविस्तर निवेदन दिले होते.
तरीदेखील काहीच त्यावर उपाय योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हा पारंपरिक मच्छीमारांना कोणीही वाली नाही. कालबाह्य झालेल्या नौकासुद्धा एल.ई. डी. लाईटद्वारे मासेमारी जोरदार करत आहेत. हर्णै समुद्रात रात्रीच्या वेळेस अस वाटत की एखादं बेट वगैरे आहे की काय एवढ्या नौका एकत्रित मासेमारी करत असतात.
यामध्ये रत्नागिरी आणि रायगड मधील नौकांचा भरपूर प्रमाणात समावेश आहे. हे शासनाला का दिसत नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया दापोली मच्छीमार संघटनेचे सचिव प्रकाश रघुवीर यांनी दिली.
हर्णे येथे एल.ई.डी व पर्ससीननेट व फास्टर नौकांचा घुसखोरी करून अवैध मासेमारी करत धुमाकूळ
