रत्नागिरी:-विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या पुढाकाराने आय आय टी एम प्रवर्तक, आय आय टी मद्रास आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी द्वारा संचालित कोंकणातील कातळशिल्प संशोधन या ‘राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पाच्या’ माध्यमातून चालू असलेल्या संशोधनात्मक कामातून दक्षिण कोंकणातील कातळ सड्यांवर अश्मयुगात मानवाचा वावर होता याचे पुरावे दगडी हत्या-यांच्या पुढे आले आहेत. कोंकणातील मानवी उक्रांतीच्या प्रवासात ही खूप मोठी आणि महत्वपूर्ण उपलब्धी आहे. तसेच दक्षिण कोंकणात आढळून येत असलेल्या कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी देखील हे महत्वपूर्ण पुरावे आहेत.
गेल्या 10 ते 12 वर्षात रत्नागिरी मधील सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेन्द्र ठाकूरदेसाई ह्या मंडळीनी आपल्या अखंड मेहनतीतून कातळशिल्प रूपी जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व असलेला एक अनोखा वारसा ठेवा जगासमोर आणला आहे. हे कार्य शोधापुरते मर्यादित नसून यावर श्री. तेजस गर्गे, संचालक पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने तसेच श्री. ऋत्विज आपटे, पुरातत्व अभ्यासक आणि विविध ज्ञान शाखेतील तज्ञ मंडळींच्या साथीने अधिक सखोल संशोधनात्मक काम चालू आहे. या कामाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांची जोड मिळाली असून आय आय टी एम प्रवर्तक, आय आय टी मद्रास ही भारतातील एक अग्रगण्य संस्था या कामात सहभागी झाली आहे. या सर्वांच्या सहकार्याने कोंकणातील कातळशिल्प या विषयावर सर्वांगीण ‘कातळशिल्प संशोधन’ संशोधन सुरु झाले आहे. या संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्वीय सर्वेक्षण.
ह्या सुरु असलेल्या संशोधनात्मक कामामध्ये ऋत्विज आपटे, सुधीर रिसबुड व धनंजय मराठे यांसह ‘कातळशिल्प संशोधन’ प्रकल्पावर कार्यरत तरुण संशोधक दिव्यांश कुमार सिन्हा, रघुनाथ बोकिल, मधुसूदन राव. स्नेहा धबडगाव, रेणुका जोशी, तार्किक खातू ह्यांचा समावेश आहे.
संचालक, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या पूर्वपरवानगीने हे पुरातत्वीय सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यातील काही कातळशिल्प ठिकाणांच्या परिसरात अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली आहेत. पुढील संशोधनात्मक कामासाठी यातील काही नमुने गोळा करून त्यावर शास्त्राrय चाचण्या करण्यात येत आहेत.
गेली वर्षभर चालू असलेल्या या संशोधनात्मक कामातून मिळालेली दगडी हत्यारे ही काही मध्यम आकाराची तसेच काही सूक्ष्म आकाराची आहेत. यात प्रामुख्याने तासणी, सूक्ष्म पाती, गाभे (ण्दो), प्रिपेड कोर, छिलके यांचा समावेश आहे. मिळालेल्या दगडी हत्यायांचे आकार, बनविण्याची पद्धती यांवरून ही दगडी हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग या कालखंडातील हे पुढे आले आहे.
18 ते 20 लाख वर्षांपूर्वी मानवाने दगडांचा वापर हत्यारे म्हणून सुरू केला. जसजशी मानवाची प्रगती होत गेली, अनुभवात वाढ होऊ लागली तसतसे मानवाने दगडांना आकार देऊन सहज बाळगता येतील उपयुक्त हत्यारे बनविण्यास बनविण्यास सुरवात केली. या हत्यायांच्या सहाय्याने मानवाने शिकार करणे, मेलेल्या जनावराचे मास साफ करणे, फाडणे इत्यादी गोष्टी करू लागला. काळानुरूप दगडी हत्यायांमध्ये झालेल्या बदलानुसार त्यांचे आकार, पद्धती, निर्मितीचे तंत्र यानुसार त्यांचे कालखंड ठरवले जातात.
कोंकणात मिळालेली हत्यारे ही आपल्याला ह्याचा अंदाज नक्की देतात की कोकणात मानवी वस्ती अंदाजे किती सालापासून अस्तित्वात होती. मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसविसन पूर्व 40,000 ते 10,000 ह्या कालखंडातील ही हत्यारे असावीत. कोंकणच्या प्रागैतिहासिक कालखंडाबाबत पुरातत्वीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे पुरावे ह्या रूपाने समोर आले आहेत. ह्या कालखंडात राहणाया माणसानेच ही कातळ खोद चित्र काढली की आणि कोणीतरी ह्याबाबत सद्य स्थितीला काहीही ठोस स्वरूपात सांगणे अवघड आहे पण मिळालेल्या हत्यारानुसार एक गोष्ट नक्की की 40,000 वर्षापूर्वी कोकणात मानवाचे अस्तित्व होते.
या संशोधन केंद्राच्या वतीने कातळशिल्प रचनांमागील विविध पैलूनवर विविध स्तरांवर संशोधनात्मक कामे चालू आहेत. ह्या कामाची माहिती तसेच मिळालेली दगडी हत्यारे सर्वसामान्य जन माणसानं पाहण्यास रत्नागिरीतील “कोंकणातील कातळ खोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्र” ह्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
कोकणात’ सापडली अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारे
