रत्नागिरी:-रोजगार हमी योजनेंतर्गंत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची पूर्वी निश्चित करण्यात आलेली जागा अनेक लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ घेण्यामध्ये अडचणीची ठरत होती. मात्र, जमीन क्षेत्रामध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. त्याचवेळी अनुदानामध्येही दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठा मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शासनाकडून रोजगार हमी योजनेंतर्गंत लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला विहीर खोदाईसाठी अनुदान मिळताना त्याच्या जोडीने रोजगारही उपलब्ध होत आहे. मात्र विहिरीची लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे साताबारा उताऱ्यावर किमान दिड एकर क्षेत्र असण्याची अट घालण्यात आली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सलग क्षेत्राची दीड एकर जागा असलेला सातबारा उतारा नसल्याने सिंचन विहिरीचा लाभ घेण्याची इच्छा असूनही त्यांना विहिरीचा लाभ घेता येत नव्हता. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेवून शासनाने सिंचन विहिरीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये शिथिलता आणली आहे. त्यामध्ये दीड एकरवरून सिंचन विहिरीसाठी आवश्यक क्षेत्र एक एकरवर आणण्यात आले आहे. त्याचवेळी संबंधित शेतकऱ्यांची सामायिक जागा असेल तरीही सिंचन विहीरीचा लाभ घेता येणार आहे. दोन शेतकऱ्यांची सामायिक जागा असेल व सामायिक जमिनीलगतच्या शेतकऱ्यांना जर विहीर हवी असेल तर दोघांनाही प्रत्येकी एक-एक विहीर आता नव्या निकषामुळे मंजूर होणार आहे. त्यामुळे आता लगतच्या शेतकऱ्यालाही सिंचन विहिरीचा लाभ मिळणे शक्य झाले आहे. एका बाजूला सिंचन विहिरीच्या क्षेत्रामध्ये घट आणलेली असताना अनुदानामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये 2 लाखाऐवजी 4 लाख अनुदान करण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन विहिरीचा लाभ घेणे शेतकऱ्याला अधिक सोयीचे झाले आहे.