४ डिसेंबर २०२३ हा दिवस भारतीय नौदलाच्या, महाराष्ट्राच्या, कोेकण किनारपट्टीच्या इतिहासातला एक संस्मरणीय दिवस ठरणार आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण शहराला भेट देऊन, छत्रपती शिवरायांच्या ४३ फूट उंच ब्राँझ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत.
शिवाय ते सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन, भारतीय नौदलाचा ‘आरमार दिन’ तिथे साजरा करणार आहेत.
दरवर्षी दि. १ डिसेंबर ते ७ डिसेंबर हा आठवडा ‘नौदल सप्ताह’ म्हणून आणि त्यातला ४ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा होत असतो. त्यानिमित्ताने भारतीय नौदलाच्या सर्व केंद्रांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे नौदलाच्या शक्तीचं प्रदर्शन नागरिकांना घडवलं जातं. भारताच्या पश्चिम किनार्यावरचं मुंबई हे नौदलाचं पश्चिमी मुख्यालय. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईची नौदल गोदी आणि निवडक लढाऊ जहाज पाहण्यासाठी सर्वांना मुक्तद्वार असतं. विविध संचलनं, कवायती, नौदल घोष पथक (नेव्हल बँड) यांचे कार्यक्रम रोज होतात. भारतीय नौदलांचं सामर्थ्य, त्याची लढाऊ गलबतं आणि त्याचे आरमारी सैनिक यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, त्यांच्याबद्दल विश्वास आणि अभिमान वाटावा असे या सगळ्या सोहळ्याचे उद्देश असतात. समाजही या सप्ताहाला एवढा भरभरून प्रतिसाद देतो की, नौसैनिक भारावून जातात. यंदा हा सगळा सोहळा मालवण बंदरात साजरा होणार आहे.
१९७२ सालच्या मे महिन्यात भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्यांची एक बैठक घेऊन, असा निर्णय घेण्यात आला की, या वर्षीपासून म्हणजे १९७२ पासून दरवर्षीच्या डिसेंबर महिन्याचा पहिला संपूर्ण आठवडा हा ‘नौदल सप्ताह’ आणि त्यातला ४ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा केला जावा, तोपर्यंत म्हणजे १९७१ सालापर्यंत १ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ समजला जात असे. त्यात आता बदल करण्यात यावा. यानुसार १९७२ पासून नवी पद्धत सुरू झाली. या अगोदर २१ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा होत असे. तुम्ही म्हणाल की, ही सगळी काम भानगड आहे? नौदल दिनाच्या तारखा अशा सतरा वेळा बदलण्याचं काय कारण?
याचं मुख्य कारण असं आहे की, आपल्या आजच्या आधुनिक नौदलाची परंपरा ‘ईस्ट इंडिया कंपनी’ या इंग्रजी कंपनीपासून सुरू होते. दि. ३१ डिसेंबर १५९९ या दिवशी म्हणजे व्यवहारात इस १६०० साली लंडनमध्ये स्थापन झालेल्या, ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने भारत आणि आग्नेय आशियातील देशांशी व्यापार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. दि. २४ ऑगस्ट १६०८ या दिवशी ईस्ट कंपनीचं पहिलं जहाज सुरत बंदरात येऊन थडकलं. का? सुरतेलाच का? कारण, तत्कालीन भारतातलं सर्वात मोठं राज्य जे मुघल साम्राज्य, त्याचा संपूर्ण समुद्री व्यवहार, व्यापार हा सुरतेमार्फत चालत असे. म्हणजेच सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक, व्यापारी राजधानी होती. मुघल बादशहा जहांगीर यांच्याकडून व्यापार करण्याचा रितसर परवाना मिळवण्यात कंपनीची चार वर्षे गेली. १६१२ साली इंग्रजांना जहांगीरांने व्यापाराची परवानगी दिली. हे पोर्तुगीजांना सहन झालं नाही, तेव्हा सुरतेबाहेरच्या समुद्रात पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यात आरमारी लढाई झाली, त्यात इंग्रज जिंकले;
पण पोर्तुगीज आणि डच हे आपल्याला सुखासुखी व्यापार करू देणार नाहीत, हे इंग्रजांनी ओळखलं. त्यांनी त्याच वर्षी सुरत बंदरात सुवाली या ठिकाणी आपलं पहिलं लढाऊ आरमार उभं केलं, तो दिवस होता-दि. ५ सप्टेंबर १६१२. या आरमाराला इंग्रजांनी नाव दिलं-‘ऑनरेबल ईस्ट इंडिया कंपनीज मरीन.’ या आरमारात साधारण ३०० टन वजनाची दोन ते चार पाऊंडांच्या सहा तोफा बाळगणारी गलबत प्रकारची हलकी जहाजं होती, तर ६०० टन वजनाची ८ ते १२ पाऊंडांच्या सहा तोफा बाळगणारी ‘गुराब’ प्रकारची भारी जहाज पण होती. हे इंग्रजांचं भारतातलं पहिलं नौदल. पुढे १६३५ साली इंग्रजांनी सुरत बंदरात स्वतःची वेगळी गोदी बांधून, भारताताच जहाज बांधणी सुरू केली. जहाज बांधणी किंवा जहाजांवर खलाशी म्हणून इंग्रज शक्यतो देशी लोकांना म्हणजे भारतातल्या हिंदू किंवा मुसलमानांना भरती करीत नसत, मग घेणार तरी कुणाला? इंग्लंडहून किती माणसं आणणार? तेव्हा त्यांनी पारशी लोकांना भरती करायला सुरुवात केली.
पुढे शिवरायांनी १६६४ आणि १६७० यावर्षी सुरत लुटली. या आधी आणि नंतरही सुरतेत वारंवार अफवा उठत की, ‘शिवाजी आया मराठे, आये, भागो.’ मग लोकांची धावपळ उडे. मुघल बादशहा औरंगजेब आणि त्याचे गुजरात सुभ्यामधले सुभेदार सुरतेच संरक्षण करु शकत नाहीत, हे पाहिल्यावर इंग्रजांनी हळूहळू सुरतेतून चंबूगबाळं आवरलं आणि ते मुंबईत स्थिरावले. सन १६८६ साली ‘ईस्ट इंडिया कंपनीज मरीन’च नव्याने बारसं होऊन, ते झालं- ‘बॉम्बे मरीन.’ या ‘बॉम्बे मरीन’ने सुरुवातीला सिद्दी आणि कान्होजी आंग्रे यांच्या आरमारांकडून सपाटून मार खाल्ला, तरी इंग्रज मुंबईत तगून राहिले आणि सन १७३६ साली त्यांनी सुरतेहून लवजी नसरखानजी वाडिया या कुशल मिस्त्रीला बोलावून घेऊन, मुंबईत गोदी उभी केली. मुंबईत इंग्रजी आरमारी नि व्यापारी जहाजबांधणी सुरू झाली.
पोर्तुगीज हेच काम वसईजवळच्या आगाशी बंदरात आणि गोव्यात करीत होते. आधुनिक जहाज बांधणीचं आणि एकंदरीतच आधुनिक नौकानयनाचं तंत्र आणि शास्त्र भारतातल्या हिंदूंना आणि मुसलमानांना कळू नये, म्हणून ते पण सजग होते. त्यांनी या कामासाठी बाटग्या किरिस्ताव मंडळींना भरती केलं. पुढे मराठ्यांनी सिद्दी आणि पोर्तुगीजांनी आरमारी सत्ता संपवली; पण पानिपतच्या तडाख्याने नि त्याहीपेक्षा माधवराव पेशव्याच्या अकाली मृत्यूने स्वतः मराठी सत्ताच निर्णायकी झाली. तोपर्यंत इंग्रज पूर्व किनारपट्टीवर मद्रास आणि कलकत्ता इथे मजबूत ठाणी घालून बसले होते. अखेर इंग्रजांनी संपूर्ण देश बळकावला आणि ‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र नि ज्याचा समुद्र त्याचा व्यापार’ हेच सूत्र पुढील काळात चालणार आहे, हे सिद्ध केलं.
या सगळ्या कालखंडांत ‘बॉम्बे मरीन’चं ‘इंडियन नेव्ही’ मग पुन्हा काही काळ ‘बॉम्बे मरीन’ आणि अखेर १८७७ साली ‘हर मॅजेस्टी’ज इंडियन मरीन’ अशी नावं बदलत गेली. १८७७ साली या नौदलाचे पूर्व विभाग-मुख्यालय कलकत्ता आणि पश्चिम विभाग-मुख्यालय मुंबई असे दोन विभाग झाले. १८९२ साली पुन्हा नौदलाचं नाव बदलून, ते ‘रॉयल इंडियन मरीन’ असं झालं. १९१४ ते १९१८च्या पहिल्या जागतिक युद्धात ‘रॉयल इंडियन मरीन’ने उत्तम कामगिरी बजावली. अजूनही भारतीयांना आधुनिक नौकानयन तंत्र न शिकवणं, कमीत कमी शिकवणं यांना फक्त खलाशी म्हणूनच भरती करणं, अधिकारी म्हणून बढती नाकारणं वगैरे इंग्रजी लबाडी चालूच होती. पण, वेगाने बदलणार्या काळापुढे अखेर त्यांचाही नाईलाज झाला. १९२३ साली पहिल्या भारतीय माणसाला अधिकारी म्हणून भरती करावंच लागलं.
१९३९ ते १९४५च्या दुसर्या महायुद्धातही ‘रॉयल इंडियन मरीन’ने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यातली ठळक म्हणजे, १९४४ साली हिंदी महासागरातल्या सेशल्स बेटांजवळ ‘गोदावरी’ या युद्धनौकेने एका जर्मन पाणबुडीला बुडवलं. ‘यू-१९८’ किंवा ‘जर्मन यू-बोट’ या नावाने ओळखल्या जाणार्या, या पाणबुड्यांनी दुसर्या महायुद्ध काळात भयंकर धुमाकूळ घालून दोस्त राष्ट्रांच्या असंख्य जहाजांना जलसमाधी दिली होती. या सगळ्या काळात नौदल दिवस वगैरे विषय फक्त ब्रिटनच्या नौदलापुरताच मर्यादित होता. दि. २१ ऑक्टोबर १८०५ या दिवशी ब्रिटिश शाही नौदलाने ट्रॅफल्गर या ठिकाणच्या नाविक युद्धात फ्रान्स आणि स्पेन यांच्या संयुक्त नौदलाचा साफ फज्जा उडवून प्रचंड विजय मिळवला होता. आता ‘रॉयल इंडियन मरीन’ला त्या दिवशी नौदल दिवस साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार दि. २१ ऑक्टोबर १९४४ या दिवशी ‘रॉयल’ इंडियन मरीन’ने आपला पहिला नौदल दिवस साजरा केला. पुढे दि. २ सप्टेंबर १९४५ला दुसरे महायुद्ध संपलं. त्यानंतर नौदल दिवस १ डिसेंबर १९४५ या दिवशी साजरा व्हावा; कारण ऑक्टोबरपेक्षा डिसेंबरमध्ये एकंदरीत हवामान चांगलं असतं, असा निर्णय भारतीय नौदलाच्या ब्रिटिश श्रेणींनी घेतला.
पण, इथेच इतिहासाने वळण घेतलं. मुंबई बंदरात उभ्या असलेल्या ‘तलवार’ या जहाजावर दि. ३० नोव्हेंबर १९४५ या दिवशी बंड झालं. हेच ते प्रख्यात ‘नाविकांचे बंड’ ज्यामुळे आता आपल्याला भारत सोडावा लागणार, याची इंग्रजांना खात्री पटली.स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारतीय नौदल श्रेष्ठींनी असे ठरवले की, १५ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ आणि तो दिवस येणारा संपूर्ण आठवडा हा ‘नौदल सप्ताह’ म्हणून साजरा करायचा. ही परंपरा १९४७ ते १९७१ पर्यंत चालू राहिली. १९७१च्या डिसेंबर महिन्यात भारतीय नौदलाने प्रचंड पराक्रम गाजवून, सगळ्या जगाला दीपवून सोडलं. पश्चिमेकडे अरबी समुद्रात भारतीय नौदलाने मुंबईपासून कराचीपर्यंत धडक मारून, पाकिस्तानची आरमारी शक्ती पार लुळीपांगळी करून टाकली. कराची बंदर तर इतकं धडाडून पेटवून दिलं की, त्याच्या ज्वाळा समुद्रातून १०० सागरी मैलांवरून सुद्धा दिसत होत्या. पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात भारताचा मानबिंदू असलेली विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ ही अंदमान बेटांमध्ये होती.
पाकिस्तानी पाणबुडी ‘गाझी’ तिच्या मागावर होती. भारतीय नौदल अधिकार्यांनी मुद्दाम चुकीचे संदेश पाठवून ‘विक्रांत’ ही विशाखापट्टणम बंदरात आहे, अशी ‘गाझी’ची समजूत करून दिली.थोडक्यात, ‘गाझी’साठी सापळा लावला. ‘गाझी’ त्यात अडकली आणि दोन सणसणीत पाणतीर (डेफ्थ चार्जेस) खाऊन निजधामाला गेली. मग ‘विक्रांत’ बाहेर पडली आणि तिने पूर्व पाकिस्तानच्या कॉक्स बझार, चित्तगाँग, खुलना, मंगला या बंदरांना भाजून काढलं, विक्रांत आणि तिच्या साहाय्यक युद्धनौकांनी केलेल्या सागरी कोंडीमुळे पाकिस्तान आपल्या पूर्व पाकिस्तानमधल्या ९४ हजार सैन्याला कसलीही रसद पुरवू शकला नाही. परिणामी, दि. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानने सपशेल गुडघे टेकले.
१९७१च्या या युद्धात स्वतंत्र भारताच्या नौदलाने प्रथमच भाग घेऊन समुद्र जिंकला. म्हणून मे १९७२ मध्ये निर्णय घेण्यात आला की, आता डिसेंबरचा पहिला आठवडा हा ‘नौदल सप्ताह’ आणि कराचीवरच्या हल्ल्याचा ४ डिसेंबर हा दिवस म्हणजे ‘नौदल दिवस.’ आता यावर्षी पंतप्रधानांनी ही सगळी परंपरा छत्रपती शिवराय या आधुनिक इतिहासातल्या भारतीय भारतीय आरमार निर्मात्याला नेऊन भिडवली आहे.